Mithun chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासंदर्भात आज ३० सप्टेंबर रोजी महत्वाची घोषणा करण्यात आली. मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जाणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील मिथुन चक्रवर्ती यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचं निवड समितीने म्हटलं आहे. हा पुरस्कार ८ ऑक्टोबर रोजी मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय ? (Mithun Chakraborty)
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत दादासाहेब फाळके पुरस्कारासंदर्भात ही अधिकृत घोषणा केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘मिथुन दा यांचा सिनेविश्वातील उल्लेखनील प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवडकर्त्या ज्युरींनी हा पुरस्कार भारतीय सिनेमातील विलक्षण योगदानाबद्दल श्री. मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्याचे ठरवले, हे जाहीर करताना अत्यंत अभिमान वाटतो आहे’.’
अवश्य वाचा : ”सोयाबिनला ८५०० रुपये भाव द्या”
मिथुन यांची कारकीर्द (Mithun Chakraborty)
अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. माहितीनुसार, त्यांच्या नावावर ३५० हून अधिक सिनेमे आहेत. अभिनयाशिवाय त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले आहे, सध्या मिथुन राजकारणात विशेष सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले असून दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला.
१९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मात्र त्यांच्या करिअरची गाडी ‘डिस्को डान्सर’ या सिनेमामुळे सुसाट सुटली. त्यांनी आत्तापर्यंत ‘डिस्को डान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पांच’, ‘सहस’, ‘वरदात’, ‘बॉक्सर’, ‘प्यारी बहाना’, ‘प्रेम प्रतिज्ञा’,’ मुजरिम’ आणि ‘अग्निपथ’ सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटात काम केले आहे.