Dead body : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात शीर धडावेगळे करत हत्या (Murder) केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात खून, दरोडा (Robbery), चोऱ्या, खुनाचा प्रयत्न, अपहरनाच्या घटना नियमित घडत आहेत. या घटनांमुळे जिल्ह्यात गुन्हेगारांना (Criminal) पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी परिसरात शीर, दोन्ही हात आणि एक पाय नसलेला तरुणाचा मृतदेह (Dead body) पोत्यात बांधलेल्या स्थितीत विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अवश्य वाचा : खोक्या भोसलेला प्रयागराज न्यायालयात का हजर करणार?
जिल्हाभर खुनाचे सत्र सुरूच
गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यात अशीच एक घटना घडली होती. तालुक्यातील बोधेगाव येथे मंदिरातील एका मूर्तीची विटंबना केल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून पुजाराचे खून करून शीर धडावेगळे केले होते. तसेच त्या मृतदेहाची विल्हेवाट लावून धड एका विहिरीत टाकून दिले. तर शीर दुसऱ्या विहिरीत टाकले होते. मात्र, या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या. तर तिसरी घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात घडली. आंबेगाव (ता. पुणे) येथील एका २८ वर्षीय महिलेचा खून ५३ वर्षीय पुरुषाने केला. प्रेम संबंधातून महिलेचा खून करण्यात आल्याचे तपासात पुढे आले होते. संबंधित आरोपीने महिलेला राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात आणले. तेथे त्यांच्यात काही तरी वाद झाला. त्याने रागाच्या भरात कोयत्याने महिलेचे शीर धडावेगळे करून खून केला. तसेच स्वतः वांबोरी पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : ‘सुरेश धस यांना समज द्या’;पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी
सातत्याने गुन्ह्यांमध्ये वाढ (Dead body)
तसेच राहाता तालुक्यात मुलाने वडिलांची तर पाथर्डी तालुक्यात सख्ख्या भावाने भावाचा खून केल्याची घटना घडली. सुमारे एक महिन्यापूर्वी नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील भांगरे वस्तीवर एका महिलेचा भरदिवसा चाकूने वार करुन खून केला. या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. तसेच गेल्या १५ दिवसांपूर्वी तपोवन परिसरातून एका युवकाचे अपहरण करून त्याचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडगाव गुप्ता शिवारातील केकताई परिसरात त्याचा मृतदेह पेटवून दिला. ही घटना ताजी असतानांच आता श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी परिसरात शीर, दोन्ही हात आणि एक पाय नसलेला तरुणाचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या स्थितीत विहिरीत आढळून आला आहे. त्याचेही शीर धडावेगळे करण्यात आले. अशा घटनांमध्ये वाढ होत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.