Deadly Attack : श्रीगोंदा : तालुक्यातील निमगाव खलु परिसरात दालमीया भारत ग्रीन व्हीजन लिमिटेड कंपनीचे मॅनेजर सिव्हिल इंजिनिअर विशाल महादेव पाटील (वय ३७) यांच्यावर पाच जणांनी मिळून जीवघेणा हल्ला (Deadly Attack) केला. या मारहाणीत (Beating) पाटील यांच्या कानाचा पडदा फाटला असून, “पुन्हा इथे आलात तर जिवे मारू,” अशी धमकीही त्यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी सुशांत शिंदे, सतीश शिंदे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात विशाल महादेव पाटील यांच्या फिर्यादी (Complaint) वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
विशाल महादेव पाटील (वय ३७, रा. बेळगाव, कर्नाटक) हे दालमीया भारत ग्रीन व्हीजन लिमिटेड कंपनीत मॅनेजर सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार, दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाटील हे त्यांचे सहकारी अरुण डिडवाणी आणि चालक प्रशांत कौलकर यांच्यासह निमगाव खलु येथील कंपनीच्या जागेत कामासाठी गेले होते. त्यावेळी स्थानिक रहिवासी सुशांत शिंदे, सतिष शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी व्यक्तींनी तिथे येऊन “तू इथे कशाला आला आहेस? इथून निघून जा, पुन्हा इथे यायचे नाही,” असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाटील यांनी “मी कंपनीच्या जागेत काम करण्यासाठी आलो आहे,” असे सांगताच आरोपी सुशांत शिंदे याने त्यांच्या डाव्या कानावर एका जड आणि टणक वस्तूने जोरात प्रहार केला. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मध्ये सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. “जर पुन्हा इथे आलात, तर तुला जिवे ठार मारून टाकीन,” अशी धमकी देत आरोपींनी तिथून पळ काढला.
अवश्य वाचा : प्रभाग सातमध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार: बाबासाहेब वाकळे
प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालय येथे हलवले (Deadly Attack)
हल्ल्यानंतर जखमी विशाल पाटील यांना तातडीने श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत त्यांच्या डाव्या कानाचा पडदा फाटला असून त्यास छिद्र पडल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.
हेही वाचा : जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी रूपाली रासकरविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल



