Death : संगमनेर: तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे निळवंडे कालव्याच्या (Nilawande Canal) कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात पडून बुडाल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना बुधवारी (ता.१७) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. रितेश सारंगधर पावसे ( वय १२) व प्रणव सारंगधर पावसे ( वय ८) दोघेही (रा.हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त विकासकामे: विखे पाटील
पाय घसरून पडल्याची शंका (Death)
रितेश हिवरगाव पावसा येथील शाळेत पाचवीत तर प्रणव प्राथमिक शाळेत तिसरीत शिकत होता. एक वर्षांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले होते. त्यांची आई कष्टाने शेती करून उदरनिर्वाह करत मुलांचा सांभाळ करत होती. रामनवमीनिमित्त शाळेला सुट्टी होती. त्यामुळे ते दुपारी जेवण करून सायकलवरुन खेळण्यासाठी घरापासून काही अंतरावरील निळवंडे कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाकडे गेले होते. त्यांच्याशी बोलून ते खेळता खेळता एका शेततळ्याजवळ आले. या दरम्यान पाय घसरुन ते शेततळ्यात पडले असावेत. शेततळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ते बुडाले.
नक्की वाचा: रांजणगाव मशीद येथील दरोड्यातील सहा आरोपी गजाआड
पाण्यावर तरंगणाऱ्या चपला दिसल्याने शंका (Death)
या परिसरातील काही लोकांना शेततळ्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या चपला दिसल्याने, त्यांना काहीतरी अघटीत घडल्याची शंका आली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर एक मृतदेह बाहेर काढला. मात्र, दुसरा मृतदेह शोधण्यासाठी पाणबुड्याला बोलवावे लागले. दोघाही मुलांना बेशुध्दावस्थेत सायंकाळी सहाच्या सुमारास तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, ते दोघेही औषोधोपचारापूर्वीच मयत झाल्याचे तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले. त्यांच्या खबरीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन उगले करीत आहेत. एकाच घरातील दोन सख्ख्या लहान भावांच्या अकस्मात मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.