Death threat | यात्रेतील पाळण्याचे टेंडर दिले नाही म्हणून नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

नगरसेवकांची पोलीस प्रशासनाकडे धाव

0

Death threat : राहाता: नगरपरिषदेचे नगरसेवक दशरथ अशोक तुपे यांना तुषार सदाफळ याने फोनवरून तसेच चौकात जमाव जमवून जीवे मारण्याची धमकी (Death threat) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास राहाता शहरातील तुषार गणेश सदाफळ नावाच्या व्यक्तीने नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन केला. राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर तुमच्या मर्जीतल्या लोकांना देतात का? आमच्या पोटावर पाय दिला, असा जाब विचारत सदाफळ याने तुपे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

अवश्य वाचा- अमेरिकेकडून भारताला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची सूट; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

नगरसेवकांची पोलीस प्रशासनाकडे धाव (Death threat)

धमकीचे सत्र एवढ्यावरच थांबले नाही , तर रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुषार सदाफळ याने काही गुंड प्रवृत्तीची माणसे गोळा केली. तिथे जमा झालेल्या जमावाने नगरसेवक तुपे यांच्याबद्दल “याला आज जिवंत मारून टाका , याचा काटाच काढू” अशी प्रक्षोभक विधाने करून मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा केला.
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, तुषार सदाफळ याच्याकडे बंदूक असून, तो या शस्त्राचा धाक दाखवून दशरथ तुपे यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष बाब म्हणजे, नगरसेवक दशरथ तुपे यांचा पाळण्याच्या टेंडर प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नसताना, केवळ राजकीय किंवा वैयक्तिक द्वेषातून हा प्रकार घडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगरसेवक दशरथ तुपे यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.  

नक्की वाचा- VSR कंपनी मालक व्ही. के सिंगला सीआयडीकडून शाही पाहुणचार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा

गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी (Death threat)

घटनास्थळाजवळील (शिवाजी महाराज चौक) सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवावी.संबंधित व्यक्तीवर त्वरित कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.नगरसेवक दशरथ तुपे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे राहता शहरात राजकीय वातावरण तापले असून, लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारे जाहीर धमकी दिली जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहाता पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमावत करत आहेत.