नगर : भारताच्या लेकीने जागतिक स्तरावर मोठा विक्रम करत थेट सुवर्णपदकाला(Gold Medal) गवसणी घातली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ (Para Athletics World Championship) मध्ये दीप्ती जीवनजीने सुवर्णपदक पटकावत ४०० मीटरच्या शर्यतीत विश्वविक्रम केला आहे.
नक्की वाचा : डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस
भारताच्या दीप्तीने अमेरिकन ॲथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला (Deepthi Jeevanji)
दीप्ती जीवनजीने टी-२० मध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत हा विश्वविक्रम केला आहे. तिने एवढे अंतर अवघ्या ५५.०७ सेकंदात पूर्ण केले आहे. यासह भारताच्या दीप्तीने अमेरिकन ॲथलीट ब्रेना क्लार्कचा विक्रम मोडला. यापूर्वी अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कने पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५५.१२ सेकंदांत ४०० मीटर अंतर पार केले होते. मात्र भारताच्या दीप्तीने तिचा हा विश्वविक्रम मोडीत काढला.
अवश्य वाचा : मांडओहोळ जलाशयात नगरचे दोघे बुडाले
दीप्तीमुळे सुवर्ण पदक भारताच्या पदरात (Deepthi Jeevanji)
तुर्कीच्या आयसेल ओंडरने ५५.१९ सेकंदात शर्यत पूर्ण केल्याने तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर इक्वेडोरच्या लिझानशेला अँगुलोने ५६.६८ सेकंदात अंतर गाठून तिसरे स्थान पटकावले. दरम्यान, या आधी दीप्ती जीवनजीने रविवारी (ता.१९) झालेल्या फेरीत ५६.१८ सेकंदाची वेळ घेत अंतर गाठले आणि फायनलचे तिकीट पक्के केले होते. तिने ५६.१८ सेकंदात अंतर गाठून आशियाई स्तरावर विक्रम केला होता. पण आता दीप्तीने विश्वविक्रम करत थेट सुवर्ण पदक भारताच्या पदरात टाकले. दीप्तीने वयाच्या २० व्या वर्षी पहिले जगज्जेतेपद पटकावले होते. तिने २०२२ मध्ये प्रथम यासाठी धावण्यास सुरुवात केली.
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ ला १७ मे पासून सुरुवात झाली असून, ही चॅम्पियनशिप येत्या शनिवारी २५ मे ला संपणार आहे. या स्पर्धेत दीप्तीने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. भारताच्या खात्यात या स्पर्धेत आतापर्यंत एकूण चार पदके आली आहेत.