Delhi Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोट (Delhi Bomb Blast) झाला आहे. या घटनेचा तपास वेगाने सुरू असताना या प्रकरणात वापरण्यात आलेल्या कारबाबत पुलवामामधून (Pulwama) मोठी माहिती समोर आली आहे. दिल्ली स्फोटासाठी वापरलेल्या i-20 कारचा (i-20 car) चालक म्हणून नाव आलेल्या मोहम्मद उमरच्या कुटुंबीयांनी या घटनेत वापरण्यात आलेली कार आमची नसल्याचा दावा केलाय.
‘घटनेत वापरलेली कार आमची नाही’
उमरच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, “घटनेत वापरलेली कार आमची नाही. आमची कार अजूनही घराबाहेर उभी आहे. हरियाणा पासिंग नंबरची कोणतीही गाडी आमच्याकडे नाही. आमची मुलं कधीच दिल्लीत गेली नाहीत. उमर हा पुलवामामध्येच प्लंबिंगचं काम करतो,”असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली स्फोट प्रकरण नेमकं काय ?
दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी ६.५२ वाजता i-२० कारमध्ये भीषण स्फोट झाला, ज्यात ९ जणांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले. स्फोट इतका प्रचंड होता की, काही मृतांच्या शरीराचे तुकडेही दूरवर उडाले. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ही i-२० कार काश्मीरमधील पुलवामाच्या मोहम्मद उमर या व्यक्तीच्या नावावर होती आणि कारमध्ये अमोनियम नायट्रेटसारखी शक्तिशाली स्फोटके असल्याचे आढळले. सुरक्षा यंत्रणांना या स्फोटाचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आहे. मोहम्मद उमर हा फरीदाबादच्या सारंगपूर स्फोट प्रकरणाशीही संबंध असल्याचे समजते. दिल्ली पोलिस आणि एनआयए या दोन्ही संस्था आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



