
Devendra Fadnavis : मराठी लोक कुणाची भाकर खातायत ? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा,असं विधान झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी केलं होतं. निशिकांत दुबेंच्या या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विरोधकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा : पुण्यात तरुणाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून निषेध
‘निशिकांत दुबे यांचं अशाप्रकारे बोलणं योग्य नाही’ (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निशिकांत दुबे यांचं जर पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. ते मराठी माणसाला सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि, माझं मत आहे की, अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मी पुन्हा एकदा सांगतो की, मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे.
अवश्य वाचा : “आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना नाही, पण देवेंद्र फडणवीसांना जमलं”- राज ठाकरे
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? (Devendra Fadnavis)
आपल्याला कल्पना आहे की, ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ते जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली. आपल्याला माहिती आहे की, पानिपतची लढाई देखील मराठी माणसेच लढले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.