Devendra Fadnavis : राजकारणात भाजप काय खेळी करेल याचा कोणीही विचार करू शकत नाही. आता अकोट नगरपरिषदेत (Akot Nagarparishad) भाजपने चक्क एमआयएमला (MIM) सत्तेसाठी सोबत घेतल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) मात्र संतापले आहेत. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला.
या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झालीय. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तर सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची (BJP Congress Alliance Ambernath Nagarparishad) युती झाली.
नक्की वाचा: निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?
शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या भाजपचे वरिष्ठ नेते देशपातळीवर ठोकत असतात, तर दुसरीकडे नगरपरिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसत आहे. भाजपच्या याच भूमिकेवरुन आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
अवश्य वाचा: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन;’असा’होता त्यांचा पायलटपासून राजकारणापर्यंतचा प्रवास
ज्याने कोणी ही युती केली असेल, त्यांच्यावर कारवाई होईल – फडणवीस (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती केली. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याने देवेंद्र फडणवीस स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल, त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
अकोट नगरपरिषदेत नेमकं काय घडलं ? (Devendra Fadnavis)
अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतले आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणार आहेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा ‘व्हिप’ पाळावा लागणार आहे. १३ जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करतील. अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, मात्र ३५ सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं. भाजपला सर्वाधिक म्हणजे ११ जागा मिळाल्या तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे ५ जागा मिळाल्या. त्यामुळे बहु मताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने चक्क एमआयएमशी हातमिळवणी केली आहे.



