Dhananjay Munde : अहिल्यानगर : राज्यभर गाजत असलेल्या बीड मधील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. यादरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे अखेर धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रश्न उपस्थित केले आहेत.
नक्की वाचा : पूर्ववैमनस्यातून अपहृत तरुणाचा खून; आणखी पाच आरोपी ताब्यात
उद्धव ठाकरे म्हणाले की
“मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नांचं उत्तर द्यायला पाहिजे. डिसेंबरपासून बीडच्या घटनेची चर्चा सुरु आहे. यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचं कारण दिलं. मी त्यांच्या तब्येतीबाबत काही बोलणार नाही. पण राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय? नैतिक जबाबदारी की तब्येतीचं कारण? हे स्पष्ट करावं. कारण अजित पवारांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. आता बीडच्या घटनेतील एवढे फोटो बाहेर आल्यानंतर देखील धनंजय मुंडेंनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असेल तर याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा या आधीच का घेतला नाही? मग आता राजीनामा दिला आहे तर तो कोणत्या कारणाने दिला? हे देखील सांगितलं पाहिजे”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार
फोटो आधीच मुख्यमंत्र्यांकडे आले होते का? (Dhananjay Munde)
“धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सर्व आमदारांनी भूमिका मांडली. आता सर्वांना प्रश्न असा आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो सरकारकडे आधी आले नव्हते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शीपणे काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण पारदर्शीपणे काम करत असताना त्यांचे हात कोणी बांधतंय का? हा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो आधीच मुख्यमंत्र्यांकडे आले होते का? जर आले असतील तर मग धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची कारवाई आधीच का झाली नाही ?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.