Dhangar Reservation : नेवासा फाटा येथील बहुचर्चित उपोषण स्थगित

Dhangar Reservation : नेवासा फाटा येथील बहुचर्चित उपोषण स्थगित

0
Dhangar Reservation

Dhangar Reservation : नेवासा : जलसमाधी प्रकरणाने चर्चेत आलेले नेवासाफाटा येथील धनगर समाज (Dhangar Reservation) बांधवांचे उपोषण आज (ता.२८) सायंकाळी मागे घेण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व पुढाऱ्यांनी आरक्षण मुद्दा व दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण थांबविण्यात आले. दोन उपोषणकर्ते व रास्ता रोको करणाऱ्या ८० जणांवर नेवासा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: भाऊबीजेच्या ओवाळणीपासून एकही बहीण वंचित राहणार नाही; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

चिठ्ठी लिहून ठेवत झाले होते बेपत्ता

धनगर समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे याकरीता बाळासाहेब कोळसे, प्रल्हाद सोरमारे, राजेंद्र तागड, देविदास मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने बुधवारी (ता.१८) उपोषणास बसले होते. यातील दोघांनी जलसमाधी करीत आहोत, अशी चिठ्ठी लिहून ठेवत बेपत्ता झाले होते. यानंतर गोदावरी पुलावर झालेल्या आंदोलनाने वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना मोठा त्रास व प्रशासनास शोधमोहीम करावी लागली होती.

अवश्य वाचा: नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस – नीलेश लंके

चर्चा झाल्यानंतर उपोषण केले स्थगित (Dhangar Reservation)

आज सायंकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, सरचिटणीस नितीन दिनकर, प्रदेश सरचिटणीस नवनाथ पडळकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डाॅ. शशिकांत तरंगे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उपोषणार्थींना लिंबू-सरबत देण्यात आले. माजी मंत्री राम शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. यावेळी अण्णासाहेब बाचकर,अशोक कोळेकर, दत्तात्रय खेमनर उपस्थित होते. जय मल्हार असा जयघोष करीत सर्व व्यासपीठाच्या खाली उतरले.

८० जणांवर गुन्हा दाखल (Dhangar Reservation)

जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवत बेपत्ता झालेले प्रल्हाद सोरमारे व बाळासाहेब कोळसे काल शुक्रवारी(ता.२७) रोजी सकाळी दोन किलोमीटर दूर म्हाळापूर भागात सापडल्यानंतर रात्री उशिरा फौजदार भारत बोडखे यांच्या फिर्यादीवरून सोरमारे, कोळसे व अन्य ८० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धनगर समाजास आरक्षण देण्याची मागणी वरिष्ठांपर्यंत देऊन उपोषणकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. शेवटच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन ठरविले जाईल, असे सांगण्यात आले.