Dhawal Kulkarni | भारताचा माजी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी यांची श्री विशाल गणेश मंदिराला सदिच्छा भेट

0

Dhawal Kulkarni | नगर : भारताचा (India) माजी क्रिकेटपटू तथा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे गोलंदाजीचे मुख्य प्रशिक्षक धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते विधीवत महापूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर देवस्थानतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष  अभय आगरकर, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, प्रा. माणिकराव विधाते, नितीन पुंड, परेश लोखंडे, गणेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच  धवल कुलकर्णी यांच्यासमवेत श्रद्धा धवल कुलकर्णी, प्रल्हाद खरपुडे व नूतन खरपुडे हेही उपस्थित होते.

हे वाचा – श्रीगोंद्यात १ कोटी ८५ लाखांचा ‘गोवा पॅटर्न’ उद्ध्वस्त!

मनाला विलक्षण शांती

यावेळी बोलताना धवल कुलकर्णी म्हणाले की, श्री विशाल गणेश मंदिर हे शहराचे श्रद्धास्थान असून येथे येऊन मनाला विलक्षण शांती लाभते. व्यस्त क्रीडा जीवनात अशा देवस्थानात दर्शन घेतल्याने मानसिक समाधान मिळते आणि नव्या ऊर्जेची अनुभूती येते, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनतीबरोबरच श्रद्धा, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. अशा देवस्थानांकडून मिळणारी प्रेरणा केवळ खेळातच नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अवश्य वाचा – गॅस टाकीचा भीषण स्फोट; पती-पत्नी गंभीर जखमी, श्रीगोंदा तालुक्यातील घटना

पवित्र भूमीत सन्मान

देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले की, देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचा श्री विशाल गणेश मंदिराच्या पवित्र भूमीत सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. धवल कुलकर्णी यांचे क्रिकेट क्षेत्रातील योगदान युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

समाजात सकारात्मक संदेश

आगरकर पुढे म्हणाले की, श्री विशाल गणेश देवस्थान हे केवळ धार्मिक केंद्र नसून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र आहे. समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून पुढील पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा देवस्थानचा प्रयत्न असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे पहा – ज्योतिषाच्या सल्ल्याने पेटला सूडाचा वणवा;पोटच्या मुलीनेच घेतला आईचा जीव

प्रा. माणिकराव विधाते यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. नितीन पुंड यांनी सूत्रसंचालन केले. विजय कोथिंबिरे यांनी आभार मानले. यावेळी अहिल्यानगर मधील युवा क्रिकेट खेळाडूंनी धवल कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here