Dilip Prabhavalkar : ‘नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहिला पाहिजे’ – दिलीप प्रभावळकर 

नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता, असं मत जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले.

0
नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे - दिलीप प्रभावळकर

नगर : नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो, पण काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. त्या भूमिकांमुळे माझा काही सामाजिक संस्थांशी संपर्क आला, मी त्यांच्याशी जोडलो गेलो. नट म्हणून ही माझी मिळकत आहे. नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता, असं मत जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : नगरच्या कार्तिक नन्नवरेला तीन सुवर्णपदके

ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगलेल्या १३ व्या विठ्ठल उमप स्मृतीसंगीत समारोह (Vitthal Ump memorial concert) आणि मृद‌्‌गंध पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला गायक नंदेश उमप, माजी महापौर नरेश म्हस्के, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, सरिता उमप यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : सावधान; नगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

यावेळी भावना व्यक्त करताना दिलीप प्रभावळकर म्हणाले की, मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मी चुकून या क्षेत्रात आलो आहे. ज्यांच्या कार्याला मी मानतो त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोककलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मिळाला हे माझे भाग्य मानतो. 

यावेळी मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी गायक सुदेश भोसले, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनुराधा भोसले, लोककलेतील कलावंत आतांबर शिरढोणकर, अभिनय क्षेत्रात उत्तम ठसा उमटवणारे अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नवोन्मेष म्हणून गायिका केतकी माटेगावकर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ‘आयुष्यावर बोलू काही’ या संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या सदाबहार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

विठ्ठल उमप हे लोककलेचे हे विद्यापीठ असल्याचे मत व्यक्त करत सामंत म्हणाले की, यंदाचा हा पुरस्कार सोहळा १३ वा आहे. १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृतीसंगीत समारोह रत्नागिरीमध्ये होईल. त्या सोहळ्याची जबाबदारी मी घेईन, असेही सामंत म्हणाले. अनुराधा भोसले यांनी ऊसतोड कामगार आणि शाळाबाह्य झालेले बालकामगार याकडे व्यासपीठावरून लक्ष वेधल्याने या विषयाला अनुसरून पुढील १५ दिवसांत सर्व उद्योजकांची बैठक लावून बालकामगार काढून टाकले जातील, असे आश्वासनही सामंत यांनी दिले.

चिन्मयी सुमित यांनी उपस्थित केलेल्या मराठी शाळांच्या मुद्द्यावर डॉ.नीलम  गोऱ्हे म्हणाल्या की, पालकांशी संवाद साधल्यावर समजते की, त्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडेच असतो; पण यातूनच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू. शाळाबाह्य मुलांचे प्रश्न कसे हाताळता येईल यासंदर्भातही शिक्षण विभागाशी चर्चा करू, असे आश्वासनही गोऱ्हे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here