Disha Salian Case:दिशा सालियनच्या वडिलांकडून न्यायालयात याचिका दाखल;याचिकेत नेमकं काय ?

0
Disha Salian Case:दिशा सालियनच्या वडिलांकडून न्यायालयात याचिका दाखल;याचिकेत नेमकं काय ?
Disha Salian Case:दिशा सालियनच्या वडिलांकडून न्यायालयात याचिका दाखल;याचिकेत नेमकं काय ?

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha salian Murder Case) राज्यात पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल (Petition filed in Mumbai High Court) केली आहे. यासंदर्भात बुधवारी(ता.१९) संध्याकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी मोठे दावे केलेत. दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नक्की वाचा :  लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार,मात्र योजना बंद करणार नाही- अजित पवार

याचिकेत नेमकं काय ?(Disha Salian Case)

दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती,ती अशी आत्महत्या करणंच शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीय,असं सतीश सालियन यांनी याचिकेत म्हटलं आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचं सतत रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं,आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती. मुंबई पोलिसांनी दिशाचा सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या,असंही याचिकेत म्हटलं आहे.

अवश्य वाचा : औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले’- जितेंद्र आव्हाड

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार ८ जून २०२० च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती. मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मोर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं,असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंचं ४४ वेळा फोनवर बोलणं झाल्याचाही आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला.तिने १४ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलाचा दावा केली गेला. मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणा-या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलीसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात ५० तासांचा उशिर केला,असंही याचिकेत म्हटलं आहे. दिशाचा मृतदेह देखील आम्हाला फारकाळ ठेवू दिला नाही,घाईघाईत त्याचे अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडण्यात आलं. घटनेच्या दिवशीचं त्या इमारतीचं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटीव्ही फुटेज रहस्यमय रित्या गायब करण्यात आलं. तिथे असलेल्या अनेकांचं मोबाईल लोकेशन,सीडीआर यांची नोंदच घेतली गेली नाही,असा धक्कादायक दावाही सतीश सालियन यांनी याचिकेतून केला आहे.

‘उद्धव ठाकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे’ (Disha Salian Case)

सर्व माहिती असुनही राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट घडलेली घटना, संबंधित व्यक्त आणि भ्रष्ट अधिका-यांना पाठीशा घातलं. त्यामुळे त्यांचीही याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे,असंही सतीश सालियन यांनी याचिकेतून म्हटलं आहे.आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे. या सर्वांची नार्को टेस्ट, ब्रेन मैपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे,अशी मागणी देखील याचिकेतून केली आहे.

या प्रकरणी विशेष सरकारी वकिल नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी. एनआयए किंवा सीबीआय मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, असंही सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here