Distribution of educational materials | पारनेर: सामाजिक परिवर्तनाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून देत, पारंपरिक वस्त्रदानासारख्या अनिष्ट प्रथांना फाटा देत, बनकर परिवाराने एका वेगळ्या वाटेशी मैत्री केली आहे. मंगल बनकर यांच्या मातोश्री आणि प्रा. राजेंद्र लोंढे यांच्या सासूबाई, स्व.मथुराबाई भाऊसाहेब बनकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, परिवाराने शैक्षणिक साहित्याचे दान (Distribution of educational materials) करून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. संतोष भाऊसाहेब बनकर (गुरुजी) यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम साकारला गेला. मथुराबाईंच्या स्मृतीस अभिवादन करताना, केवळ औपचारिकता न करता समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास खऱ्या अर्थाने मदत व्हावी, या उदात्त हेतूने हे पाऊल उचलण्यात आले.
अवश्य वाचा- १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली!
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद (Distribution of educational materials)
या उपक्रमांतर्गत श्री गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोरेगाव येथील ३० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ३० वह्या आणि ३० पेन भेट देण्यात आले. या शैक्षणिक मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे सर व सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून बनकर परिवाराचे मनापासून आभार मानले आहेत.या सामाजिक कार्याचा ओघ येथेच थांबला नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळमकर वस्ती येथील गरजू विद्यार्थ्यांनाही या मदतीचा लाभ मिळाला. या शाळेतील १८ होतकरू विद्यार्थ्यांना १८ वह्या आणि १८ पेनचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षिका यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत करत बनकर परिवाराचे आभार मानले.आजच्या काळात पुण्यतिथीनिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून, तो पैसा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खर्च करणे हा एक मोठा सकारात्मक बदल आहे. बनकर परिवाराच्या या कृतीतून समाजाला एक मोठी शिकवण मिळाली आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होण्यास मदत झाली असून, बनकर परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



