Dombari : श्रीगोंदा: “ना आधार कुणाचा, ना शिक्षणाची वारी, उपेक्षित जगणं नशिबी, आम्ही खेळतो डोंबारी (Dombari)…” या ओळी केवळ काव्य राहिले नसून, त्या एका समाजाच्या जगण्याचं भीषण वास्तव मांडत आहेत. एका बाजूला आपण डिजिटल इंडिया (Digital India) आणि विश्वगुरू होण्याच्या बाता मारतो, पण त्याचवेळी आपल्याच आसपासची ही ‘शाळाबाह्य’ मुले पोटासाठी मृत्यूशी झुंज देत आहेत, हे सत्य खूपच विदारक असून ज्या वयात हातामध्ये पाटी-पेन्सिल असायला हवी, त्या वयात ही मुलं मृत्यूशी झुंज देणाऱ्या कसरती करून पोटाची खळगी भरत असल्याचे चित्र समोर आले आहे.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती
भीतीपेक्षा ‘आज संध्याकाळी चूल पेटेल का?’ याची चिंता
बुधवारी तालुक्यातील कोळगाव येथील बाजार असल्याने भरचौकात डोंबारी कुटुंबाचा थरार पाहायला मिळाला. एक छोटी मुलगी, जिचे वय जेमतेम खेळण्या-बागडण्याचे आहे, ती हातामध्ये लांब बांबू धरून उंचावर बांधलेल्या दोरीवरून चालत होती. खाली बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता, पण त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा ‘आज संध्याकाळी चूल पेटेल का?’ याची चिंता अधिक जाणवत होती. जमिनीपासून सहा फूट उंचीवर असलेल्या दोरीवर तिने दाखवलेले कौशल्य कोणत्याही ऑलिम्पिक खेळाडूला (Olympic Athlete) थक्क करेल असेच होते.
हे देखील वाचा: समाधान सरवणकरांचे भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप
भटकंतीमुळे ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर (Dombari)
केंद्र आणि राज्य सरकार ‘शिक्षण हक्क’ आणि ‘बेटी पढाओ’ सारख्या घोषणा देत असले, तरी या भटक्या जमातीपर्यंत या योजनांचा प्रकाश पोहोचलेला नाही. तर अनेक कुटुंबांकडे ना आधार कार्ड आहे, ना राहण्याचा कायमस्वरूपी पत्ता. भटकंतीमुळे ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून पूर्णपणे तुटलेली आहेत. डोळ्यात सुई पकडणे, कोलांटउड्या मारणे आणि दोरीवरचा समतोल राखणे ही त्यांची उपजीविकेची साधने आहेत, मात्र या कौशल्याला खेळाचा दर्जा न मिळता केवळ ‘भीक’ मागण्याचे साधन म्हणून पाहिले जाते.
पूर्वी गावच्या ओट्यावर डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला की अख्खं गाव गोळा व्हायचं. टाळ्यांच्या कडकडाटासोबतच धान्य आणि पैशांची पावती मिळायची. पण आता काळ बदलला आहे. लोकांच्या हातात स्मार्टफोन आले आणि रस्त्यावरच्या या जिवंत खेळांकडे बघणारे डोळे कमी झाले. तासनतास जीवघेणी कसरत करूनही अथक प्रयत्न नंतर शेवटी पदरात पडतात ते केवळ १०० – १५० रुपये. श्रीगोंदा तालुक्यात ठिकठिकाणी दिसणारे हे चित्र समाजाच्या प्रगत होण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. या चिमुकल्या हातांना दोरीऐवजी पुस्तकांचा आधार मिळाला, तरच खऱ्या अर्थाने हा समाज मुख्य प्रवाहात येईल. प्रशासनाने या ‘शाळाबाह्य’ मुलांकडे लक्ष देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे काळाची गरज आहे.



