Dr. Bhaskarrao Kharde : राहाता : महाराष्ट्र (Maharashtra) जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर समन्यायी पाणी वाटपा संदर्भातील मांदाडे समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालातील शिफारशींनी उर्ध्व गोदावरी मधील दारणा, गंगापूर, भंडारदरा, निळवंडे, मुळा, पालखेड प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांचा पूर्णपणे अपेक्षाभंग केला आहे. परिणामी आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी संकटात सापडणार आहे. या अहवालाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवून वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई करण्यासाठी सज्ज राहाण्याचे आवाहन भंडारदरा (Bhandardara) प्रवरा पाणी संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे (Dr. Bhaskarrao Kharde) यांनी केले आहे.
नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
हरकती देण्याची अंतिम मुदत १५ मार्च
यासंदर्भात भंडारदरा प्रवरा पाणी संवर्धन समितीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हणले आहे की, मेंढेगिरी अहवालाचे पुनर्विलोकन करुन गोदावरी खोऱ्यातील जलाशयांच्या एकात्मिक प्रवर्तनासाठी नव्याने विनियमन तयार करण्यासाठी नाशिक येथील मेरीचे महासंचालक प्रमोद मांदाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने हा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास सादर केला असून प्राधिकरणाने त्या अहवालावर हरकती व सूचना मागितल्या आहेत. हरकती देण्याची अंतिम मुदत १५ मार्च आहे. या हरकती १५ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात टपालाने किंवा ई-मेलद्वारे प्राधिकरणाकडे पाठविण्या बाबत सूचित करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
हजारो स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे काम सुरू (Dr. Bhaskarrao Kharde)
या पार्श्वभूमीवर डॉ. भास्करराव खर्डे पाटील, पाणी प्रश्नांवर काम करणारे ज्येष्ठ जलअभ्यासक जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ, सेवानिवृत्त इस्टेट मॅनेजर प्रकाश खर्डे यांनी या अहवालावर विचारमंथन करण्यासाठी विशेष बैठका घेवून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून अहवालावर हरकती घेण्यासाठी हजारो स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे काम संवर्धन समितीतर्फे सुरू केले आहे.
गोदावरी, प्रवरा, मुळा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांचे हितसंवर्धन होईल अशा हरकती नोंदविण्याबाबत समितीच्या सदस्यांनी अभ्यास केला. या हरकती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सादर करण्यात येणार आहेत. तसेच वेळ प्रसंगी न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी माहिती डॉ. भास्करराव खर्डे पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या समन्यायी पाणी वाटपा विरोधात यापूर्वी सातत्याने प्रखर संघर्ष केला आहे. यापुढेही न्याय मिळेपर्यंत तो चालूच राहील असे सुतोवाच खर्डे पाटील यांनी केले आहे. अहवालातील जायकवाडी मधील जीवंत पाणी साठ्याची ५८ टक्क्यांची शिफारस आम्हाला मान्य नसून २००५ पूर्वीचे टंचाई काळातील शासन मान्य ३३ टक्याचे धोरण पूर्ववत चालू करावे आणि मांदाडे अहवाल मान्य करु नये, अशी खर्डे पाटील यांनी मागणी केली आहे.
मादांडे समितीचा अहवाल इंग्रजीमध्ये असून यातील सर्व भाषा ही तांत्रिक असल्याने शेतकऱ्यांच्या माहितीसाठी अहवाल मराठीत प्रसिद्ध करण्याची सूचना करतानाच, मराठीत अहवाल आल्यानंतरच शेतकऱ्यांना हरकती नोंदवणे सोपे होणार असल्याने हरकती नोंदविण्याची मुदतही वाढवून देण्याची मागणी भंडारदारा प्रवरा संवर्धन समितीतर्फे करण्यात आली आहे.