Dr. Pankaj Ashiya : नगर : मुलांच्या तुलनेत मुलींचे लिंगगुणोत्तर (Female sex ratio) सुधारण्यासाठी गर्भधारणापूर्वी (Female Foeticide) आणि प्रसवपूर्व निदान (Prenatal diagnosis) (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच नियमित तपासण्यांवर अवलंबून न राहता, सापळा तपासणी तसेच गुप्त माहितीवर आधारित कारवाई प्रभावीपणे राबविण्यात यावी. संशयित आस्थापना व व्यक्तींविरोधात लक्ष केंद्रित करून, कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावी. याबाबत कोणतीही दिरंगाई करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य सुधा कांकरिया, विधी समुपदेशक ॲड. सारिका सुरासे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले,
जिल्ह्यातील मुलींच्या लिंग गुणोत्तरात अपेक्षित सुधारणा होण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक गांभीर्यपूर्वक व दक्षपणे काम करण्याची गरज आहे. गर्भधारणेपासून जन्म व जन्मानंतरच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक मुलीची नोंद व निरीक्षणे काटेकोरपणे करावीत. पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सापळा तपासणी राबवून दोषी आढळणाऱ्या आस्थापनांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावी. ज्या तालुक्यांमध्ये मुलींच्या गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. ग्राम व तालुकास्तरासह जिल्हास्तरीय यंत्रणेने या कामात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या पुरुषोत्तम कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
क्षयरोग निर्मूलनासाठी तपासणीची संख्या वाढवावी (Dr. Pankaj Ashiya)
ज्या तालुक्यांमध्ये जन्म व मृत्यू नोंदींचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्या तालुक्यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन नोंदणीची प्रलंबित प्रकरणे तातडीने पूर्ण करावीत. संबंधित तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी कारणांचा सखोल आढावा घेऊन सुधारात्मक उपाययोजना राबवाव्यात व पुढील कालावधीत नोंदणीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, याची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान व योग्य उपचार होणे हे क्षयरोग निर्मूलनासाठी महत्त्वाचे असल्याने यावर अधिक भर द्यावा. जिल्ह्यात संशयितांच्या तपासणीची संख्या वाढवावी. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत आणि प्रत्येक रुग्णाची नोंद ‘निक्षय’ पोर्टलवर करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला होण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांची नोंदणी अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. जिल्ह्यात असलेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात यावे. प्रत्येक अंगणवाडी सेविकेने दरमहा २५० पेक्षा अधिक नोंदणी करावी. याकामी आरोग्य मित्रांचीही मदत घेण्यात यावी. योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावाही घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.



