Dr. Pankaj Ashiya : कर्जत : पुणे (Pune) जिल्ह्यात मान्सून पावसाच्या जोरदार हजेरीने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बुधवारी (ता.२०) सिद्धटेक (ता.कर्जत) येथील भीमानदीच्या पुलास पाणी लागले असून भीमानदी लगतच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिला आहे. सध्या भीमानदी दौंड येथे ९५ हजार ७०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी सिद्धटेक येथील भीमा नदी (Bhima River) पात्राची पाहणी करीत स्थानिक प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
पुणे जिल्हयात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग दौंड येथील भीमानदी पात्रात सोडल्याने कर्जत तालुक्यातील भीमानदी परिसरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता धरणातून वेगाने पाणी सोडल्याने श्री क्षेत्र अष्टविनायक सिद्धटेक (ता.कर्जत) येथील भीमानदीच्या पुलास पाणी लागले आहे. सद्यस्थितीत भीमा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने परिसरातील नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.
अवश्य वाचा : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची मागणी
प्रशासनाच्या सुचनेचे पालन करण्याचे आवाहन (Dr. Pankaj Ashiya)
काही शेतात देखील पाणी घुसले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात पावसाच्या संततधारेने विसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भीमानदी लगत असणाऱ्या बेर्डी, दुधोडी, जलालपूर, भांबोरा, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, शिंपोरा, बाभूळगाव स्थानिक ग्राम प्रशासनास सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी भयभीत न होता जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या सुचनेचे पालन करीत सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे. सिद्धटेक येथील आपत्ती व्यवस्थापन दक्ष आणि सतर्क ठेवण्यात आले असून प्राप्त सुचनेनुसार आणि मागणीनुसार ते कार्यान्वित राहतील अशी ग्वाही प्रांताधिकारी पाटील यांनी दिली. पुलास लागलेले पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.