Dr. Pankaj Asia : नगर : “गावाचा विकास हा केवळ योजनांमधून होत नाही, तर गावकऱ्यांच्या एकजुटीनेच खऱ्या अर्थाने ग्रामविकास शक्य होतो. मांजरसुंबा (Manjarsumba) गावाने शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवून ‘आदर्श गाव’ (Ideal Village) म्हणून ओळख निर्माण केली आहे. हे संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Asia) यांनी केले.ते अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samriddh Panchayat Raj Abhiyan) अंतर्गत ग्रामस्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान करत ग्रामस्वच्छतेत सहभाग घेतला.
नक्की वाचा: रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या बाप्तिस्मा दिनाचा १३१ वा स्मृतीदिन श्रद्धाभावाने साजरा

महिलांना डस्टबिन वाटप
डॉ. पंकज आशिया यांनी गावात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक गावकऱ्याने अंगीकारली पाहिजे. मांजरसुंबा गावाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी कौतुकास्पद पद्धतीने घेतली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात मांजरसुंबा गावाने सर्व निकष पूर्ण करून इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला आहे. सीएसआर फंडातून राबविलेल्या विकासकामांमुळे गावाचे रूप पालटले आहे. कार्यक्रमादरम्यान डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामस्वच्छतेत सहभागी होत श्रमदान केले, तसेच गावातील महिलांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन वाटप केले.
अवश्य वाचा: बारावीची परीक्षा सुरू ; कर्जत तालुक्यात ३ हजार १८० विद्यार्थ्यांनी दिला पेपर

ग्रामस्थांसोबत संवाद (Dr. Pankaj Asia)
त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यांना भेट देऊन, शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळतो का याची विचारपूस केली.
गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. गावातील महिलांनी आणि युवकांनी ग्रामस्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धन या तिन्ही क्षेत्रात पुढाकार घेतल्यास विकासाची गती आणखी वाढेल.
हे देखील वाचा: राजयोगाच्या नियमित अभ्यासाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलतो : साधना दिदी

जनावरांना दिला चारा
डॉ. पंकज आशिया यांच्या आगमनावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांशी संवाद साधत असताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी “पाणी बचतीचे महत्त्व” या विषयावर पथनाट्य सादर केले.या वेळी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे प्रमाणपत्र आणि साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना चारा दिला, तसेच दूध व्यवसायाविषयी माहिती घेतली.त्यांच्या भेटीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
या प्रसंगी प्रांत अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, मंडल अधिकारी राम नलवडे, ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाळुंज, ग्राम महसूल अधिकारी अनिता जाधव, कृषी सहाय्यक सुविधा वाणी, विस्तार अधिकारी रामदास दळवी, सारंग दुगम, सरपंच रूपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, तसेच अधिकारी, कर्मचारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकास या तिन्ही अंगांनी मांजरसुंबा गावाने उभा केलेला आदर्श हा संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी क्यत केले.



