Dr. Rajendra Pipada : राहाता : गेल्या अनेक दिवसांपासुन शिर्डी (Shirdi) व परिसरातील गावांमध्ये ६० ते ७० वर्षापासुन वास्तव्यास असलेल्या दलित, वंचित, उपेक्षित,अल्पसंख्यांक समाजातील लोकांना बेघर करण्याचे काम सुरु आहे. त्यातील बऱ्याच ठिकाणावर कुठलेही विकासाचे प्रयोजन नसताना नागरिकांची घरे तोडण्यात आली आहेत. यामुळे जनतेमध्ये सरकार विषयी विनाकारण असंतोष निर्माण होत आहे. तरी जे लोक ६० ते ७० वर्षापासुन गावोगावी एकाच ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यांना त्याच जागेचा स्वतंत्र सातबारा करुन द्यावा व यापुढे दलित, वंचित, उपेक्षित, अल्पसंख्यांक समाजातील लोकांची घरे तोडून त्यांना बेघर करण्याच्या कारवाया होवु नये याकरीता आपण लक्ष घालावे अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा (Dr. Rajendra Pipada) यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नक्की वाचा : इतिहासातून शिका, अन्यथा पुनरावृत्ती अटळ : रामगिरी महाराज
अनेक कुटुंब बेघर
शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर परिसर, देशमुख चारी, निमगाव, सावळीविहीर इत्यादी ठिकाणी ६० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बेघर केल्यामुळे परिसरातील वातावरण अत्यंत भावनिक व संतापजनक झाले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांची घरे जे.सी.बी. व पोकलेनच्या सहाय्याने पाडण्यात आल्यामुळे अनेक कुटुंब अक्षरशः बेघर झाली आहे. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात प्रचंड वेदना दिसून येत आहेत. ही घटना समजताच भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी तातडीने लक्ष्मीनगर व परिसरातील कारवाया झालेल्या ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी प्रभावित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा, समस्या आणि भावना शांतपणे ऐकून घेतल्या. अनेक नागरिक गेल्या ६० ते ७० वर्षांपेक्षा अधिक काळापासून या ठिकाणी आपली घरे उभारून कुटुंबासह वास्तव्य करत असल्याचे सांगितले.
अवश्य वाचा : राजळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे यश; राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत पटकविला द्वितीय क्रमांक
आयुष्याचा आधारच कोसळल्याची भावना (Dr. Rajendra Pipada)
काही कुटुंबांचे तर चार-पाच पिढ्यांपासून येथे वास्तव्य असून अचानक झालेल्या या कारवाईमुळे त्यांच्या आयुष्याचा आधारच कोसळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.आपल्या डोळ्यांसमोर आयुष्यभराची कमाई आणि संसाराचे छप्पर जमीनदोस्त होताना पाहून नागरिकांनी अत्यंत तीव्र व संतापजनक भावना व्यक्त केल्या. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. अनेक कुटुंबांवर सध्या उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. या प्रसंगी बोलताना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी नागरिकांना धीर देत सांगितले की, “मानवतेच्या दृष्टीने या कुटुंबांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करू
मुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नाचा गांभीर्याने पाठपुरावा करून प्रभावित नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच त्यांनी संबंधित प्रशासनानेही या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहावे आणि बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या कारवाईमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर असून नागरिकांना न्याय व निवारा मिळावा यासाठी आपण शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करू, असेही आश्वासन डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी उपस्थित नागरिकांना दिले. या भेटीमुळे बेघर झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात आधार मिळाला. त्यांच्या समस्येच्या न्याय्य तोडग्यासाठी आता सर्वांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.



