Drama : नगर : आर्थिक परिस्थितीपुढे हतबल झालेल्या कलाकाराला जेव्हा स्वतःची तत्वे बासनात बांधून काम करावे लागते. तेव्हा स्वतःच्या आवडीला मुरड घालून काम करताना त्याची होणारी तगमग आणि त्यामुळे आयुष्यावर होणारे दूरगामी परिणाम अधोरेखित करणारं नाटक (Drama) राज्य नाट्य स्पर्धेच्या (State Drama Competition) अहिल्यानगर (Ahilyanagar) केंद्रावर सादर झालं.
नक्की वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी
घोडेगावच्या समर्थ युवा प्रतिष्ठानकडून नाटकाचं सादरीकरण
रविशंकर झिंगरे लिखीत, संदीप येळवंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दुसरा अंक’ या नाटकाचं सादरीकरण घोडेगावच्या समर्थ युवा प्रतिष्ठानकडून मंगळवारी (ता.३) करण्यात आलं. नाटकाचा पडदा उघडताच दिवाणखान्यातील खुर्चीवर बसलेला एक स्वमग्न वृद्ध कलाकार (सुरेश चौधरी) नजरेस पडतो. थोड्याच वेळात स्मरणिकेसाठी त्यांची मुलाखत घ्यायला दोन तरुण (आदिनाथ बडे, राज वैरागर) तिथे येतात. एकेकाळी मोठा लेखक असलेल्या त्या वृद्धाशी ते दोघेजण बोलत असताना कथानक भूतकाळाकडे सरकते. नाट्यपरंपरेवर विलक्षण प्रेम करणारा उल्हास कोळी (संदीप येळवंडे) हा नाट्यलेखक अर्थार्जनासाठी एका बँकेत काम करत असतो. राज्यनाट्य स्पर्धेसाठी तो एका नाटकाचा पहिला अंक लिहून पूर्ण करतो. त्याच्या लिखाणावर अपत्याप्रमाणे प्रेम करणारी त्याची पत्नी नेत्रा (डॉ. भावना रणशूर) एका आजाराने त्रस्त असते. पुढे उल्हासची नोकरी जाते आणि तो आर्थिक विवंचनेत सापडतो. या गडबडीत नाटकाचा दुसरा अंक लिहिण्याचे राहूनच जाते आणि त्याच्याच जीवनाचा दुसरा अंक सुरू होतो.
अवश्य वाचा : शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”,अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य
कलाकाराच्या आयुष्यावर हे नाटक भाष्य करते (Drama)
त्याच्या या हतबलतेचा फायदा त्याचा मित्र नाथा घेण्याचे ठरवतो. नेत्रावरील उपचार आणि गावी असलेल्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी अशा आर्थिक गर्तेत सापडलेल्या उल्हासला तो व्यावसायिक नाटकांकडे वळवतो. आयुष्यभर निपुत्रिक राहिलेल्या आणि उल्हासच्या साहित्यावर मनस्वी प्रेम करणाऱ्या नेत्राचे आजारपणातच निधन होते. आणि उल्हासच्या नाटकाचा दुसरा अंक ऐकण्याची तिची इच्छा अपुरी राहते. तिच्या निधनानंतर प्रथितयश लेखक बनलेल्या उल्हासला अपुऱ्या नाटकाचा दुसरा अंक लिहिण्याची इच्छा जाचत राहते. त्यातून तो दारूच्या आहारी जातो. कलाकाराच्या आयुष्याचा हा ‘दुसरा अंक’ त्याच्यासाठी किती वेदनादायी ठरू शकतो, यावर हे नाटक भाष्य करते.
संदीप येळवंडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकेची जबाबदारी चांगली निभावली. योगेश रासने यांचे जयराम हे पात्र प्रभावी ठरले. डॉ. भावना रणशूर यांच्या नेत्रा या भूमिकेने सर्वांना प्रभावित केले. त्यांनी पल्लेदार संवादांना अभिनयाची योग्य जोड दिल्याने त्यांचा रंगमंचावरील वावर आत्मविश्वासपूर्ण वाटला. राजेंद्र पाटोळे यांचे नेपथ्य आणि नीरज लिमकर यांची प्रकाशयोजना उत्तम. स्नेहल सैंदाणे, डॉ. सुनील वैरागर, संतोष इखे यांची रंगभूषा आणि वेशभूषा चांगली निभावली. विशाल बोरुडे यांचे संगीत आणि रंगमंच व्यवस्था सुसंगत होती.
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कलाकाराला नियती अशा काही चक्रव्यूहात अडकवून टाकते की, त्यातून तो इच्छा असूनही बाहेर पडू शकत नाही. त्यातून त्याच्या वाट्याला आलेली आंतरिक वेदना त्याला आयुष्यभर दंश करत राहते, असा आशय असलेला ‘दुसरा अंक’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले, असे म्हणता येईल.