Drama : नगर : आपल्याकडे उच्चवर्णीय आणि कनिष्ठ जातींमधील भेद युगानुयुगांपासून पाहायला मिळतो. भारतातील (India) ही सामाजिक दरी भरून काढण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर जातिभेद कायद्याने नाहीसा झाला, पण व्यवहारात नाही. राजकीय मंडळींनी (Political Person) हा जातीय भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याचे भांडवलच केले. पुरोगामित्वाचे बेगडी समर्थन करत वर्ण व्यवस्था संपवण्याऐवजी तिला कुरवाळत ठेवून स्वतःच्या मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या पुढाऱ्याचे प्रभावी प्रतिबिंब ‘कन्यादान’ या नाटकातून (Drama) उमटले.
नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सही; पुण्यातील रुग्णाला मिळाली मदत
विजय तेंडुलकर लिखित व अनंत जोशी दिग्दर्शित ‘कन्यादान’
प्रख्यात मराठी लेखक विजय तेंडुलकर लिखित व अनंत जोशी दिग्दर्शित ‘कन्यादान’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत नाट्य आराधना या संघाने शुक्रवारी (ता.६) अहिल्यानगर केंद्रावर सादर केलं. या नाटकाचे कथानक नाथ देवळालीकर या समाजवादी, स्वतंत्र विचाराच्या एक उच्च जातीच्या नेत्याभोवती आणि महत्वाचे म्हणजे बापलेकीच्या नात्याभोवती फिरते. नाथ देवळालीकर (श्रेणिक शिंगवी) हे आमदार असून त्यांच्या पत्नी सेवा (तेजा पाठक) या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांची मुले जयप्रकाश (मोहित मेहेर) आणि ज्योती (सिद्धी कुलकर्णी) असे हे चौकोनी कुटुंब. पहिल्या दृश्यात ज्योती तिच्या पालकांना अरुण आठवले (तेजस अतितकर) या दलित तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय सांगते. हे जाणून सेवाला धक्का बसला आहे, मात्र, नाथ यांना त्यांचे स्वप्न असलेली जातीव्यवस्था दूर करायची आहे. तो सेवा आणि जयप्रकाश यांचा विरोध पत्करून ज्योतीला अरुणसोबत लग्नाला संमती देतो.
अवश्य वाचा : टंचाईग्रस्त नागलवाडीत पाणीच पाणी; जलयुक्त शिवारने केली किमया
समाजवादी विचारसरणीचे नाथ, शेवटी मात्र हतबल (Drama)
ज्योती आणि अरुणचे लग्न झाल्यावर राहण्यासाठी स्वतःचे घर नसल्याने ते सतत घर बदलत राहतात. दरम्यान, अरुण ज्योतीला दारू पिऊन मारहाण करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे नाथ त्यांनी आपल्या घरी राहावे यासाठी सेवा आणि जयप्रकाश यांना आपला निर्णय कळवतात. गोंधळलेली दुःखी-कष्टी ज्योती त्याला विरोध करत असतानाच अरुण नशेत तिथे येऊन ज्योतीची माफी मागू लागतो. ज्योती पुन्हा त्याच्यासोबत निघून जाते. पुढे एका प्रकाशन सोहळ्यात नाथ स्वतःच्या इच्छेविरुद्ध अरुणच्या आत्मचरित्राची प्रशंसा करून ढोंगी भाषण देतात. नाथांना ज्योतीला आणखी त्रास होण्यापासून रोखायचे आहे, परंतु ज्योतीला हे सहन होत नाही आणि ती कायमची घर सोडते. दलित जावई मिळाल्यामुळे सुरुवातीच्या काळात, आपल्या समाजवादी विचारसरणीचा अभिमान बाळगणारे नाथ, नाटकाच्या शेवटी मात्र, अतिशय केविलवाणे आणि हतबल होतात. मुलीच्या आयुष्याची झालेली फरफट त्यांना आयुष्यभराची बोचणी देऊन जाते. आणि नाथांच्या घरी परत न येण्याच्या ज्योतीच्या निश्चयाने नाटकाचा शेवट होतो.
आपल्या मूल्यांवर आयुष्यभर ठाम असलेले आणि पुरोगामित्वाचा देखावा करणारे नाथ देवळालीकर हे पात्र श्रेणिक शिंगवी यांनी उत्तम साकारले. पण एका दृश्यात त्यांनी अरुणचा प्रकाशराव असा केलेला उल्लेख सुज्ञ प्रेक्षकांच्या नजरेतून सुटला नाही. तेजा पाठक आणि मोहित मेहेर यांनी त्यांच्या पात्रांना चांगला न्याय दिला. सिद्धी कुलकर्णी हिने साकारलेल्या ज्योती या पात्राला तोड नव्हती. तिच्या टोचणाऱ्या खणखणीत संवादांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तेजस अतितकर यांनी देखील अरुणचे पात्र चांगले वटवले. प्रसाद भणगे आणि अनंत रिसे यांच्या छोट्या भूमिका उत्तम झाल्या.
या पूर्वी अनेक मोठ्या कलाकारांनी सादर केलेल्या विजय तेंडुलकर लिखित या नाटकाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य अनंत जोशी यांनी सक्षमपणे पेलले. वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रयोगादरम्यान दोनदा व्यत्यय आला. अनंत रिसे यांनी साकारलेले नेपथ्य संहितेनुरूप होती. प्रकाश योजना(गणेश लिमकर), पार्श्वसंगीत (शीतल देशमुख), रंगभूषा (चंद्रकांत सैंदाणे), वेशभूषा (मैथिली जोशी) सुसंगत होत्या.
भारतीय संस्कृतीत कन्यादान हे सर्वोत्कृष्ट दानांपैकी एक मानले गेले आहे. पण उच्च आणि खालच्या जातींमधील वर्षानुवर्षांचा भेद आणि त्यात सामाजिक व राजकीय घटकांचा असलेला हस्तक्षेप; यामुळे तर आंतरजातीय विवाह यशस्वी होत नसतील का? शेवटी असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात नाटक यशस्वी होते.