Drama : नगर : म्हातारपण (Old Age) म्हणजे कळत्या वयातील एक बालपण असते. या वयात शरीर साथ देण्यास हळूहळू असमर्थ ठरू लागते. त्यामुळे थोडीशी चिडचिड हटवादीपणा वाढतो. त्यात आजारी वृद्ध असेल तर मुलांसाठी ते ओझं वाटायला लागते. त्यांना घरातील म्हातारी माणसं त्यांच्या संसारातील अडसर वाटू लागतात. वृद्ध पत्नीच्या सेवेसाठी धडपडणाऱ्या असहाय्य पतीची व्यथा ‘बस इतकंच’ या नाटकातून (Drama) पाहायला मिळाली.

नक्की वाचा : भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन होणार! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
श्रीरामपूरच्या कर्णेज ॲकॅडमीतर्फे केंद्रावर सादर
डॉ. दिनेश कदम लिखित व डॉ. गणेश मुडेगावकर आणि डॉ. वृषाली भुजबळ-वाघुंडे दिग्दर्शित ‘बस इतकंच’ हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेत मंगळवारी (ता.१०) श्रीरामपूरच्या कर्णेज ॲकॅडमीतर्फे अहिल्यानगर केंद्रावर सादर झाले. सुरुवातीलाच माई (आकांक्षा) या पात्राच्या प्रवेशाने नाटकाला सुरूवात होते. फ्लॅशबॅकमध्ये ती तिचा सुरूवातीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना दिसते. दुसऱ्या दृश्यात तिचे वृद्ध पती अण्णा (प्रा. अशोक कर्णे) माईला शोधत घरात प्रवेश करतात. अपघातामुळे अधू झालेल्या वृद्ध माईला अण्णा वॉकरच्या सहाय्याने बिछान्यावर बसवतात. त्यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजेच दिनूचे किराणा दुकान असून सुनबाईकडून त्या दोघांचे खाण्यापिण्याचे हाल होत असतात. त्यामुळे अण्णा सुनेच्या अपरोक्ष त्यांच्या आवडीच्या गाडीवरील भजी आणून माईला आणि दिनूला खाऊ घालतात. त्यांचा लहान मुलगा श्याम पुण्यात असून तो कित्येक वर्षे त्यांना भेटायला आलेला नाही. माईंच्या औषधांच्या खर्च खूप असल्याने आणि ते दोघे आता निरुपयोगी झाल्याने मुलगा दिनू (गणेश करडे) व सुनेला (काजोल गायकवाड) नकोसे झालेत.

अवश्य वाचा : ‘महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा वीज महाग’-जयंत पाटील
न्यायालयातील अण्णांच्या गंभीर संवादांनी नाटकाचा शेवट (Drama)
अण्णांच्या नावावर असलेल्या गावाकडील जमिनीवर त्यांचा डोळा आहे. परंतु माईचा जमीन विकायला विरोध असल्याने दिनू वृद्ध आई-वडिलांसाठी भाड्याने खोली पाहतो आणि त्यांना घरातून काढून देतो. वृद्ध अण्णा, माईची जमेल तशी काळजी घेत असतात. तिथे त्यांना एकदिवस अनाथ सदाशिव भेटतो आणि तो माईची सेवा करू लागतो. दिनू आणि मनीषाकडून गावाकडची जमीन विकण्यासाठी दबाव आणला जातो. माईच्या वाट्याला आलेले असे हलाखीचे दीनवाणे जीवन न पहावल्याने अण्णा माईला संपवून मुक्ती देतात. शेवटच्या दृश्यात अण्णा न्यायालयात कबुली देऊन ती गावाकडची जमीन सरकारच्या नावावर करणार असल्याचे सांगतात. आणि तिथे एक शाळा काढून शाळेला माईचे नाव देण्याचे सुचवतात. न्यायालयातील अण्णांच्या गंभीर संवादांनी नाटकाचा पडदा पडतो.

अशोक कर्णे यांनी अण्णा हे पात्र चांगले वठवले. आकांक्षा गर्जे यांची माई ही भूमिका अप्रतिम केली. गणेश करडे यांनी दिनूची तर सूनेची भूमिका काजोल गायकवाड यांनी उत्तम साकारली. अक्षय खंडागळे याची सदाशिव ही छोटी भूमिका उत्तम ठरली. प्रकाशयोजना (नवनाथ कर्डिले), वेशभूषा (आर्वी व्ही. आर), रंगभूषा (सुनीता कर्णे), संगीत (मयूर वाकचौरे) ठिक-ठाक होते. नेपथ्य आणि पार्श्वसंगीत अजून प्रभावी करण्यास वाव होता. वार्धक्यात पोटच्या मुलांकडून होणाऱ्या वेदनादायी हालअपेष्टा प्रेक्षकांसमोर मांडण्यात नाटक यशस्वी झाले.