Drama | राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकाला (Drama) हाऊसफुल्लचा बोर्ड हे क्वचितच आपल्याला पहायला अथवा ऐकायला मिळते. शनिवारी (ता. २५) संध्याकाळी नगरच्या (Ahmednagar) रंगकर्मी प्रतिष्ठानने सादर केलेलं ‘नाना थोडं थांबा ना’ हे नाटक हाऊसफुल्ल झालं. काही प्रेक्षकांनी तर अक्षरशः उभे राहून नाटक पाहिले. ऋषिकेश हराळ लिखित ‘नाना थोडं थांबा ना’ या नाटकाने प्रेक्षकांना हास्य मेजवानी दिली.
हे देखील वाचा : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
पैशांपेक्षा नाती जपणं किती महत्त्वाचं असतं हे या नाटकातून पहायला मिळालं. या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या नाटकातील छोट्यातील छोट्या पात्राने आपली भूमिका उत्कृष्ट रित्या निभावली. नाटकातील तांत्रिक बाजू अतिशय भक्कम होत्या. अचूक प्रकाश योजना, पार्श्वसंगित, नैपथ्य, रंगभूषा-वेशभूषा ही या नाटकाची जमेची बाजू ठरली. दिग्दर्शक प्रद्युम गायकवाड यांनी घेतलेली मेहनत नाटकातून दिसून येत होती. कारण प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अचूक वठविली. या नाटकातील गोदा (श्वेता पारखे) हे पात्र भाव खाऊन गेले.
नक्की वाचा : विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर त्रिसूत्री कारवाई
माजी सैनिक असलेले नाना (निवृत्ती गर्जे) यांना दोन मुलगे चंद्रभान (प्रद्युम गायकवाड) व गोरख (ऋषिकेश हराळ) व एक मुलगी गोदा (श्वेता पारखे) असे कुटुंब. चंद्रभानची बायको मंदा (स्नेहल गटणे) यांना एक मुलगा चिकू (कान्हा तिवारी) तर गोरखची बायको प्रमिला (सौंदर्या भोज), गोदाला लंबोदर (यश शिंदे) अशी मुले. नानाच्या दोन्ही मुलांत कमालीचे बंधू प्रेम. मात्र, हे दोन्ही भाऊ ऐतखाऊ. दोन्ही भाऊ व त्यांच्या बायका तसेच गोदा यांचा फक्त नानांच्या पेन्शनवर डोळा. नानांच्या पेन्शनमधील वाटा मिळावा यासाठी गोदा भावांना धमकावत असते. यातून उपाय काढण्यासाठी चिकूने नामी शक्कल लढविली. आणि यातूनच नाटकाच्या कथानकाने रंगत घेतली. आणि मंचावर आली नानाची दुसरी बायको रोझी (सृष्टी पिंपळे) इथूनच खऱ्या अर्थाने नाटकाला सुरुवात झाली.
नानाची दुसरी बायको वाजत गाजत आणली जाते. तिला या कटकारस्थानात सहभागी करून घेतले जाते. त्यासाठी तिला. दोन लाख रुपये आणि पेन्शनमधील दहा टक्के वाटा दिला जातो. चिकूच्या या नामी शक्कली प्रमाणे रोझी वागते का? या शक्कलीमुळे नानांच्या पेन्शनचा वाटा कोणाला मिळतो? चिकूच्या शक्कलीवर नाना कशी वरकडी करतात, हे दाखविणारे कथानक म्हणजे नाना थोडं थांबा ना.
नाना हे पात्र निवृत्ती गर्जे यांनी अतिशय उत्कृष्ट रित्या साकारले. माजी सैनिकाच्या आवाजातील जरब त्यानी चांगली बसविली. चंद्रभान आणि गोरख यांच्या विनोदाचे टायमिंग अफलातून होतं. यात चिकूच्या अंगिक विनादाने भाव खाल्ला. मंदा आणि प्रमिला यांना सुद्धा आपल्या भूमिकेला न्याय दिला. नानाच्या वरातीत दहा सेकंद नाचून गेलेली पात्रं सुद्धा भाव खाऊन गेली. या नाटकातील प्रकाश योजना (पवन पोटे), संगिताने (जान्हवी लटके व ओंकार ढोकणे), रंगभूषा (सौंदर्या भोज), वेषभूषा (स्नेहल गटणे व सृष्टी पिंपळे), रंगमंच व्यवस्था (प्रशांत वायभासे व श्वेता पारखे) नाटकातील उत्कंठा वाढविली. सर्वच बाजूने भक्कम अशा नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. शेवटी प्रेक्षकच म्हणाले, “किती हसविणार? आता थोडं थांबा ना…”