E-Peek Pahani : नगर : महसूल विभागामार्फत (Department of Revenue) राज्य ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. नाशिक विभागातील (Nashik Division) सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नक्की वाचा: लष्करात भरतीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा जेरबंद
नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
खरीप हंगाम २०२४-२५ करिता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी १ ऑगस्टपासून सुरुवात झाली. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करता येणार होती. परंतु, राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कळविले आहे.
अवश्य वाचा: खबरदार; गणेशोत्सवात तरुणींची छेड काढाल तर…!
१५ लाख हेक्टरवर ई-पीक पाहणी पूर्ण (E-Peek Pahani)
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये १३ सप्टेंबरपर्यंत नाशिक विभागात १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पीक पाहणी नोंदविण्यात आलेली नाही. राज्य शासनाने ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ च्या उद्देशाने स्वतः च्या शेताची पीक पाहणी स्वतः करण्याची संधी ई पीक पाहणी ॲपद्वारे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तसेच भूसंपादन इ. करिता ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले आहे.
ई-पीकच्या समस्यांसाठी हेल्पलाईन
ई-पीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या असल्यास ०२०२५७१२७१२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन मदत घेता येऊ शकते. इंटरनेटची आवश्यकता फक्त शेतकरी नोंदणी वा पीक पाहणी अपलोड करणेकामी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीक पाहणी करता येते.