Eknath Shinde : ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराना तिलांजली देऊन ज्यांनी गद्दारी केली,ती त्यांनी केली नसती तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती,असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पुस्तकाबाबत बोलताना व्यक्त केले आहे.
पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर,अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. ठाणे येथील उपवनमधील महापौर बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांनी हे विधान केले.यावेळी अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपत गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी असलेला संग्राम बाबर यानेही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
नक्की वाचा : बीडमध्ये पुन्हा राडा!अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण
बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले असते तर… (Eknath Shinde)
संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकातून केलेल्या खुलाशाबाबत एकनाथ शिंदेंना विचारले असता, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन ज्यांनी गद्दारी केली, ती त्यांनी केली नसती तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती,असं मत शिंदे यांनी व्यक्त केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाशी एकनिष्ठ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातसाठी केलेले काम आणि देशासाठी त्यांची असलेली तळमळ लक्षात आल्यानेच हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे नेतृत्व ओळखून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना वाचवण्यासाठी आपला शब्द टाकला होता. मात्र जे आज त्यांचे विचार सोडून काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले आहेत, त्यांना स्वर्गीय बाळासाहेबांची त्यामागील भूमिका समजणे शक्य नाही, असे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
अवश्य वाचा : भारत ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवणार;सुप्रिया सुळे,शशी थरूर,श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
‘शिवसेना अधिक बलवान झाली’- शिंदे (Eknath Shinde)
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे कार्यरत असलेल्या नमेश यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे केलेल्या कात्रजचा विकास आराखडा, कात्रजची वाहतूक कोंडीची समस्या, पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली असून या समस्या सोडवायला त्याना नक्की सहकार्य करू,असे सांगितले. त्यांच्या सोबत असलेल्या गावातील लाडक्या बहिणींनी त्यांना माझ्यासोबत जाण्याचा सल्ला दिला आहे,असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी शिवसेनेवर दाखवलेला हा विश्वास नक्की सार्थ ठरवू,असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.आज त्यांच्यासोबत अनेक पैलवानांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना अधिक बलवान झाली असल्याची भावना शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली.