Voting Election : कर्जत : जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) मिशन-७५ मध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला आहे. कर्जत-जामखेड निवडणूक (Election) विभागाने यंदा देखील विधानसभा मतदानाची टक्केवारीत ७५ गाठली. यासाठी महसूल विभाग, स्वीप समिती कर्जत-जामखेड यांनी विशेष परिश्रम घेत सर्वसामान्य मतदारांमध्ये विविध उपक्रम राबवत जनजागृती केली होती. जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या लोकशाहीचे शिल्पकार पुरस्कारासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक गावे पात्र ठरतील.
नक्की वाचा : ‘विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला’- देवेंद्र फडणवीस
७५ % पार करणाऱ्या गावास लोकशाहीचे शिल्पकार पुरस्कार
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी विशेष सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जिल्ह्यात मिशन ७५ संकल्पना राबवली होती. या संकल्पनेत जे गाव, शहर, आणि मतदारसंघ मतदान टक्केवारीत पंच्याहत्तरी पार करेल त्या गावास, शहरास आणि मतदारसंघास लोकशाहीचे शिल्पकार पुरस्काराची घोषणा केली होती. यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील महसूल निवडणूक विभाग, स्वीप समिती कर्जत आणि जामखेड तालुका यांनी पथनाट्य, मतदार जनजागृती रॅली, बाईक रॅली, मॅरेथॉन दौड, शालेय स्तरावर रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धा घेत मोठी जनजागृती निर्माण करीत सर्वसामान्य मतदारांपर्यत पोहचले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकूण ३५६ केंद्रापैकी तब्बल २१९ मतदान केंद्रावर यंदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे या मतदारसंघातील बहुतांश गावांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या मिशन ७५ पार केले.
अवश्य वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी
गोयकरवाडी २५० मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान (Election)
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील वाकी २९८ मतदान केंद्रावर एकूण १ हजार ३०१ मतदारांपैकी ९७६ मतदारांनी मतदान करीत मिशन ७५ मध्ये सर्वात कमी ७५.०२ टक्के मतदान नोंदवले. तर गोयकरवाडी २५० मतदान केंद्रावर सर्वाधिक ९१.१६ टक्के मतदान पार पाडले. सदरच्या मतदान केंद्रावर एकूण २९४ मतदार असून यापैकी २६८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्जत तहसील विभागाने यंदाच्या निवडणुकीसाठी मतदान हक्क बजावणीसाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, निवडणूक निरीक्षक डी रथना, निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गुरू बिराजदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष गीताचे अनावरण करीत जनजागृती केली होती. याचे विशेष कौतुक जिल्हा पातळीवर करण्यात आले होते.
कर्जत- जामखेड मतदारसंघात नागेश कन्या विद्यालय जामखेड, महात्मा गांधी विद्यालय कर्जत येथे आदर्श मतदान केंद्र तर भांडेवाडी जिल्हा परिषद शाळा हे महिला कर्मचारी संचलित मतदान केंद्र स्थापित केले होते. यासह नागेश कन्या विद्यालय जामखेड युवा कर्मचारी संचलित आणि सोनमाळी कन्या विद्यालय दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषद मुलांची शाळा जामखेड आणि जिल्हा परिषद शाळा राशीन पडदा नशीन मतदान केंद्र ठेवले होते. येथील मतदान केंद्राची सजावट मतदारांना आकर्षित करीत होती. यासह या केंद्रावर अनेकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर फोटो घेत सोशल मीडियावर व्हायरल केले होते.