Election : महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा

Election : महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा

0
Election : महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा
Election : महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा

Election : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज अहिल्यानगर शहर राजकीय कुस्तीचा आखाडा झाले होते. यातच महायुतीतील घटक पक्षांत जागा वाटपावरून बिनसले. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shiv Sena Eknath Shinde) स्वबळाचा नारा दिला. तर महाविकास आघाडीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) स्वबळावर निवडणूक (Election) लढविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत पहायला मिळणार आहे.

नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

ठाकरे गटाचे विक्रम राठोड शिंदे गटात दाखल होणार

महायुतीतील घटक पक्षांनी मागील १५ दिवसांपासून बैठकांचे सत्र केले. तरीही शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी काल (ता. २९) रात्री जाहीर केला. शिवाय ठाकरे गटाचे युवा नेते विक्रम राठोड हे शिंदे गटात दाखल होणार आहेत. ते ८ जानेवारीला पक्ष प्रवेश करणार असल्याचे समजते. शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ३४ तर भाजपने ३२ जागांवर उमेदवार दिले आहेत.

अवश्य वाचा: हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड   

महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला (Election)

महाविकास आघाडीतही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट ३२, शिवसेनेचा ठाकरे गट २४ तर काँग्रेस १२ जागा लढवत आहे. ठाकरे गट व मनसेचे राज्यात अलबेल असले तरी अहिल्यानगर शहरात हे गणित जुळू शकले नाही.


निर्णय अधिकारी कार्यालयापासून रस्ते, चौक, गल्लीबोळ सगळीकडे झेंडे, घोषणाबाजी, टोळ्या, मिरवणुका आणि शक्तिप्रदर्शन यांचे जणू प्रदर्शनच मांडले गेले. आज एकाच दिवशी आजी-माजी नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, अपक्ष मिळून सुमारे ४०० उमेदवारांनी अर्ज दाखल करून नगरची हवा तापवली. ६८ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून आजपासूनच नगरच्या राजकारणात धगधग सुरू झाली आहे.
भाजपचे माजी खासदार सुजय विखे व अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी एकत्रितपणे येऊन ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिंदे गटाला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही ठिकाणी या लढती दुरंगी तिरंगी तर काही ठिकाणी सरळ लढती या पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेचे फुलसौंदर राष्ट्रवादीत दाखल 
आजच्या घडामोडींमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला तो म्हणजे प्रभाग १४मध्ये शिवसेनेचे पहिले महापौर भगवान फुलसुंदर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये उडी घेतली. नगर महानगरपालिका स्थापन झाल्यावर २००३ साली खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फुलसौंदर यांना या नगरचा पहिला महापौर बनवले होते. 

भाजपच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाचा स्वबळाचा नारा
महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिंदे गटाला सुरुवातीपासूनच दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काल (ता. २९) भाजपने अधिकृतपणे संदेश पाठवत युती शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे शिंदे गटाने स्वबळाचा नारा दिला. दुसरीकडे, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती घट्ट झाली. अनुसूचित जागा स्वतः लढवण्याचा निर्णय घेत आरपीआयला एक जागा देऊन तडजोडीचे राजकारण सुरू झाले.

महाविकास आघाडीच्या खलबतांना यश
शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी होणार की नाही, यावर मोठे प्रश्नचिन्ह होते. मात्र खासदार निलेश लंके, शिवसेनेचे लोकसभा समन्वयक शशिकांत गाडे, काँग्रेस शहराध्यक्ष दिलीप चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर यांनी काल रात्री अनेक जागांवर एकत्र बसून निर्णय घेतले. जिथे बंडखोरीची शक्यता होती तिथे तडजोडी केल्या, ताकदवान उमेदवार निश्चित केले आणि महाविकास आघाडीचा गोंधळ मोठ्या प्रमाणात मिटवला. आज बहुतांश प्रभागांतील उमेदवार फायनल झाले.

राष्ट्रवादीचे अमित खामकर शिंदे गटात
आमदार संग्राम जगताप यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष अमित खामकर यांनी आज (ता. ३०) अचानक शिंदे गटात प्रवेश करत एबी फॉर्म मिळविला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.