
Elections : नगर : जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक (Elections) लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती (Advertisements) प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केले आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
११ नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी संबंधित अधिनियमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेश व सूचनांनुसार उमेदवारांनी कार्य करणे आवश्यक आहे.सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रमाणीकरण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफ.एम. वाहिन्या, चित्रपटगृहे, बल्क एस.एम.एस., व्हॉइस एस.एम.एस., संकेतस्थळे आदींचा समावेश होतो.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणीकरण आवश्यक (Elections)
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. या समितीत पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला अपर जिल्हाधिकारी अथवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित तहसीलदार अथवा नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणीकरण करून घेण्यासाठी त्या जाहिराती जिल्हा माहिती अधिकारी (जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी रोड, अहिल्यानगर) यांच्याकडे सादर कराव्यात. प्रस्तावित जाहिरात प्रसारित किंवा प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी संबंधित समितीकडे तिच्या प्रमाणीकरणासाठी अर्ज करावा लागेल.


