Encroachment : पाथर्डी : तालुक्यातील कुत्तरवाडी येथे वनविभागाच्या (Forest Department) जागेवर कथित अतिक्रमण (Encroachment) करून आंब्याची बाग (mango orchard) लागवड केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करावी व वनजमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवावे, या मागणीसाठी कुत्तरवाडीचे शेतकरी आबांदास गायकवाड व तिनखडीचे शेतकरी बाळू खेडकर यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले.
नक्की वाचा : भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे ‘असहकार आंदोलन’; विधानसभेतही उमटले पडसाद
सुमारे २० ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न
मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील निवृत्त कर्मचारी भुंजगनाथ दहीफळे यांनी काही स्थानिकांच्या सहकार्याने वनविभागाच्या जागेत आंब्याची फळबाग लागवड केली आहे. या बागेतून दरवर्षी सुमारे २० ते ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. संबंधित जमीन वनविभागाची असताना त्यावर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करण्यात आले आहे. काही अन्य शेतकऱ्यांचेही अतिक्रमण असल्याचे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : डोक्यावर संकट घोंगावत असताना कोल्हापूरकर दुबईतून सुखरूप घरी परतले
बेकायदेशीररीत्या खरेदी (Encroachment)
गायकवाड व खेडकर यांनी आरोप केला की, कुत्तरवाडी येथील वर्ग-दोनची जमीन २००६ साली बेकायदेशीररीत्या खरेदी करण्यात आली. ही जमीन मूळतः वनविभागाने एका मागासवर्गीय शेतकऱ्याला कसण्यासाठी दिलेली होती. मात्र, ती जमीन दहीफळे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर खरेदीखत करून घेतली गेली. संबंधित खरेदीखताची वैधता तपासून ते रद्द करावे व यामध्ये सहभागी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार
या संदर्भात पाथर्डीचे वनपरीक्षेत्र अधिकारी आदिनाथ घनवट यांनी सांगितले की, वनविभागाचे वनसर्वेक्षक पुढील एक महिन्यात संबंधित जागेची मोजणी करतील. मोजणीनंतर अतिक्रमण आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यावेळी सहाय्यक वनपरीक्षेत्र अधिकारी बबन मचंरे व आप्पासाहेब घनवट उपस्थित होते. आंदोलकांनी इशारा दिला आहे की, महिनाभरात ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.



