
Environmental Conservation : पाथर्डी: डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि तंत्र विद्यालय (Dr. Annasaheb Shinde College Of Agricultural Engineering), आदिनाथनगर येथे माजी आमदार स्व. राजीव राजळे (Rajeev Rajale) यांच्या ५६ व्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation) आणि शेतकरी सक्षमीकरण या स्व. राजळे यांच्या आवडत्या विषयांना प्राधान्य देत विद्यार्थीनी रांगोळ्यांद्वारे विविध कृषितांत्रिक संकल्पना अत्यंत कौशल्यपूर्णरीत्या साकारल्या. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त रामकिसन काकडे, विश्वस्त राहुल राजळे, बाबासाहेब किलबिले यांच्या हस्ते झाले. कृषी तंत्र विद्यालयातील तब्बल २४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला.
अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना
विविध कृषिविषयक संकल्पनांचे आकर्षक दर्शन
रांगोळ्यांमध्ये पूर्वमशागत, बीज प्रक्रिया, आधुनिक सिंचन पद्धती, सेंद्रिय खत व्यवस्थापन, कीड-रोग ओळख, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, पिकांची काढणी, पॉलीहाऊसमधील गुलाब शेती, मधमाशी पालन, भाजीपाला रोपवाटीका, पशुपालन, तसेच कृषिदूत म्हणून स्वयंरोजगाराच्या संधी अशा विविध कृषिविषयक संकल्पनांचे आकर्षक दर्शन घडले. विशेष म्हणजे, बहुतेक रांगोळ्या हळद, फुलांच्या पाकळ्या, भुसार, माती अशा नैसर्गिक रंगद्रव्यांपासून तयार केल्या होत्या.
नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
यावेळी बोलताना राहुल राजळे म्हणाले, (Environmental Conservation)
स्व. राजीव राजळे यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी, युवक आणि ग्रामविकासासाठी वेचले. विधानसभेत ते समस्यांचे वास्तव स्वरूप अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत असत. त्यांच्या स्मरणदिनानिमित्त आयोजित ही रांगोळी स्पर्धा अतिशय उपयुक्त व प्रशंसनीय आहे. राहुल राजळेंनी विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या विविध भाजीपाला प्रकल्पांना भेट देऊन भेंडी, गवार, दुधी भोपळा, दोडका, मेथी, पालक, कोथिंबीर या पिकांच्या लागवड ते विक्री व्यवस्थापनाची माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. प्राचार्य सुनील पानखडे यांनी आंबा नर्सरी, गांडूळ खत निर्मिती, पशुपालन, गुलाब पुष्पोत्पादन, तसेच रब्बी हंगाम २०२५ साठी तयार केलेल्या पिकसंग्रहालयाची सविस्तर माहिती दिली. रांगोळी स्पर्धा व कृषी प्रक्षेत्रातील विविध प्रकल्पांना डॉ. यशवंतराव गवळी, श्रीकांत मिसाळ, सचिव आर. जे. महाजन, मार्गदर्शक शिवाजी राजळे, डॉ. विनायकराव हाडके, भास्कर गोरे, विक्रमराव राजळे, प्राचार्य डॉ. एस. जी. खणगे, तसेच चंद्रकांत पानसरे, गणेश सोनटक्के, संदीप लोखंडे आदी मान्यवरांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.


