Ex-Serviceman : नगर : राष्ट्रासाठी अदम्य साहसाने सेवा बजावणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने अहिल्यानगर लष्करी तळावर (Military Base) एक भव्य माजी सैनिक (Ex-Serviceman) रॅलीचे आयोजन शनिवारी (ता. २५) करण्यात आले आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar), सोलापूर, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील सुमारे ४ हजार ५०० माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, वीर पिता व त्यांचे आश्रित सहभागी होणार आहेत.
नक्की वाचा : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील एक हरकत अंशतः मान्य; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
लष्करी अधिकारी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहतील
या रॅलीस दक्षिण महाराष्ट्र व गोवा उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विशाल आगरवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला लष्करी अधिकारी व राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. माजी सैनिकांच्या सेवा व बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित या रॅलीत कल्याणकारी योजना, पेन्शनसंबंधी सहाय्य, पुनर्वसन संधी व माजी सैनिक तसेच त्यांच्या आश्रितांसाठी मदत योजनांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
अवश्य वाचा : कर्मचारी महिलेला ५० हजारांचा गंडा; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
कल्याणकारी योजनांवरील जागरूकता (Ex-Serviceman)
मेजर जनरल विशाल आगरवाल हे या प्रसंगी माजी सैनिकांना उद्देशून संबोधित करणार आहेत. या रॅलीतील प्रमुख कार्यक्रमांमध्ये वीर नारी, वीर माता व ज्येष्ठ माजी सैनिकांचा सत्कार, पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी व विविध कल्याणकारी योजनांवरील जागरूकता उपक्रम, आरोग्यसेवा, कौशल्य विकास व पुनर्वसन विषयक प्रदर्शन स्टॉल्स यांचा समावेश असेल. तसेच माजी सैनिक व अधिकाऱ्यांमधील संवाद सत्रात त्यांच्या सूचनांवर चर्चा होणार आहे. सशस्त्र दल व माजी सैनिक समुदायातील बंध दृढ करणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण कल्याणासाठी नव्या उपक्रमांची दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



