
Fake Milk : नगर : जिल्ह्यातील (Ahilyanagar) सर्वसामान्यांच्या आरोग्यासोबत (Health) थेट खेळ करणाऱ्या बनावट दूध रॅकेटचा पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला असून एकूण ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या बनावट दुध निर्मितीला लागणारी रासायनिक क्रिम राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे तयार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
१ लिटर क्रीमपासून २० लिटर बनावट दूध
दरम्यान १४ फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे जिल्हा गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकत बनावट दूध निर्मितीचा भांडाफोड केला. यातून समोर आलेल्या माहितीनुसार ‘पॅराफिन’ (मिनरल ऑइल ९.५) या रासायनिक द्रव्याचे मिल्क क्रीम आणि पाण्यासोबत मशीनद्वारे मिश्रण करून घातक क्रीम तयार केली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे एका लिटर क्रीमपासून तब्बल २० लिटर बनावट दूध तयार केले जात होते.
ही मिल्क क्रीम देवळाली प्रवरा येथील एका गोडाऊनमध्ये तयार केली जात होती. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार हे गोडाऊन दिवसभर बंद असायचे. मात्र रात्री १० नंतर पहाटेपर्यंत येथे मशिनचा आवाज घुमत असे. अंधाराच्या आड सुरू असलेल्या या बनावट दूध कारखान्याने अनेक दिवस प्रशासनाची दिशाभूल केली. ही घातक क्रीम राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा तसेच बीड जिल्हा येथे मोठ्या प्रमाणावर पुरवली जात होती. म्हणजेच हा काळाबाजार एका तालुक्यापुरता मर्यादित नसून अनेक जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर पसरलेला होता.
नक्की पहा : मोकाट वळूंच्या झुंजीत दुचाकीचा चुराडा; घटना सीसीटीव्हीत कैद
महत्त्वाची मशिनरी गायब (Fake Milk)
गुन्हे शाखेने गोडाऊनवर धाड टाकली असता तेथील महत्त्वाची मशिनरी गायब असल्याचे आढळले. संबंधितांच्या नातेवाईकांनीच ती गायब केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुरावे नष्ट करण्याचा हा उघड प्रयत्न मानला जात असून पोलिस त्या नातेवाईकांचा कसून शोध घेत आहेत. या रॅकेटमागील सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि वितरण साखळी उघड करण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दूध हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या शरीरात विष कालवण्याचे पाप करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.


