Farmers Organization : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ

Farmers Organization

0
Farmers Organization : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ
Farmers Organization : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ

Farmers Organization : शेवगाव: उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना होऊन गेला आहे तरी, साखर कारखानदारांनी (Sugar Factory) उसाचे दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी संघटना (Farmers Organization) आक्रमक झाली आहे. त्यांनी शेवगाव (Shevgaon) तहसीलदार यांना साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेवगाव तहसील कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु साखर कारखानदारांचे कोणतेही प्रतिनिधी हजर नसल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.

अवश्य वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू  

शेवगाव तहसील कार्यालयाचा गलथान कारभार

नंतर साखर कारखानदारांना तहसील कार्यालयाकडून निमंत्रित केले नसल्याचे उघडकीस आले, असे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या बैठकीबाबत साखर सहसंचालक कार्यालयालाही कोणताही पत्रव्यवहार केला नसल्यामुळे साखर संघाचेही प्रतिनिधी हजर नव्हते. शेवगाव तहसील कार्यालयाचा गलथान कारभार यास कारणीभूत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी म्हटले. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव तहसील कार्यालयात ठिय्या मांडत मोठी घोषणाबाजी केली.

नक्की वाचा : सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी योगदान द्या : जिल्हाधिकारी

बैठक न लागल्यास १६ तारखेला ‘रास्ता रोको’ आंदोलन (Farmers Organization)

यावेळी शेतकरी संघटनेचे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी प्रशासनाच्या निषेधाचा ठराव मांडल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याला अनुमती देत ही बैठक निष्फळ ठरल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांची भेट घेऊन १६ तारखेच्या अगोदर शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची बैठक न लागल्यास १६ तारखेला ‘ रास्ता रोको’ आंदोलन करण्याचे नागरे यांना सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नागरे यांनी तुमची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, त्यामुळे आपण रास्ता रोको करू नये अशी विनंती केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, छत्रपती संभाजी नगरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, अहिल्यादेवी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, ज्येष्ठ शेतकरी नेते मच्छिंद्र आर्ले, ताराचंद लोढे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, शेवगाव तालुका अध्यक्ष अशोक मेजर भोसले, शेवगाव तालुका उपाध्यक्ष अमोल देवढे, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गर्जे, प्रशांत भराट, हरिभाऊ कबड्डी, विकास साबळे, प्रगतशील शेतकरी ढोले मामा, शेषराव अपशेटे, हरिभाऊ काळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.