Father and Son Drown : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

Father and Son Drown : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

0
Father and Son Drown : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू
Father and Son Drown : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

Father and Son Drown : श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (ता. १२) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. ९ वर्षांच्या मुलाला पोहायला शिकवत असताना ४० वर्षीय पित्याचा पाण्यात बुडून (Father and Son Drown) दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने, एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मुलाचे प्राण वाचले आहेत. अमित रंगनाथ साठे (वय ४०) असे या घटनेत मृत्यू (Death) झालेल्या इसमाचे नाव आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अमित साठे हे आपल्या ९ वर्षीय मुलगा साहिल याला पोहायला शिकवण्यासाठी देवदैठण येथील संत निमराज महाराज मंदिर व दधीची ऋषी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या सिद्ध नदीवरील के.टी. वेअरवर गेले होते. नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने अमित साठे हे खोल पाण्यात बुडू लागले. यावेळी साहिल हादेखील पाण्यात बुडत होता. त्याचवेळी तिथून जवळच असलेल्या सुधीर धोत्रे या तरुणाने आरडाओरड ऐकून तात्काळ पाण्यात उडी घेतली आणि साहिलला सुखरूप बाहेर काढले. मात्र अमित साठे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमित साठे यांचा स्थानिक तरुण नवनाथ जाधव याने सुरुवातीला शोध घेतला, मात्र पाण्याचा अंदाज आणि थकव्यामुळे माघार घ्यावी लागली.

बचाव पथकाने मृतदेह काढला बाहेर (Father and Son Drown)

घटनेची माहिती मिळताच सरपंच व ग्रामस्थांनी बेलवंडी पोलिसांशी संपर्क साधत रायगव्हाण येथील एकलव्य संघटनेचे बचाव पथक, दौलत नाना शितोळे यांची डिसास्टर रिस्क्यू फोर्स व रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशामक दलाचे पथकही तातडीने हजर झाले. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करून अमित साठे यांचा मृतदेह बाहेर काढला. या बचाव कार्यात काळू निकम, करण माळी, राहुल गायकवाड, बन्नी जाधव, दादू गायकवाड यांनी सहभाग घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरूर येथे पाठवण्यात आला. मुलाला पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या पित्यावर काळाने घाला घातल्याने देवदैठण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.