Fine : नेवासा : तालुक्यातील सौंदाळा गाव राज्यभरात आदर्श ठरत आहे. या गावातील ग्रामसभेने (Gram Sabha) घेतलेले ठराव अनुकरणीय ठरत आहेत. सौंदाळा गावात झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला आणि पुरुषांनी तसंच बाहेरुन आलेल्या लोकांनी यापुढं शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर 500 रुपयांचा दंड (Fine) सक्तीनं आकारण्यात येईल, असा ठराव करण्यात आलाय. तसंच यासंदर्भातील बॅनर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. येथील काही जणांना कारवाईलाही (Action) सामोरे जावे लागले आहे.
नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस
सायंकाळी 7 ते 9 विद्यार्थ्यांकडं मोबाईल दिसला तर दंड
सौंदाळा ग्रामसभेत अनेक आदर्शवत ठराव मंजूर करण्यात आले आहेत. आई-बहिणीवरुन शिवी देणाऱ्यांकडून 500 रुपयांचा सक्तीचा दंड आकारण्याचा निर्णय गावानं घेतलाय. तसंच सेलफोनच्या अतिरिक्त वापरामुळं शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचं निदर्शनास आल्यानं यापुढं संध्याकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडं मोबाईल द्यायचा नाही. मोबाईल दिसला तर त्या कुटुंबीयांना 500 रुपये दंड भरावा लागेल. तसंच बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा, असं घोषवाक्य ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा, त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिलं जाईल, असाही ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आलाय. समाजहिताचे निर्णय घेण्याच्या बाबतीत सौंदाळा गाव आघाडीवर राहिलं आहे. यावेळी ग्रामसभेत आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आली आहे. जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर झाल्याने स्थानिकांनी देखील या निर्णयाचं स्वागत करत काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचं म्हटलंय.
अवश्य वाचा : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना ऑडिओही बसवण्यात आलाय (Fine)
सौंदाळा गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना ऑडिओही बसवण्यात आलाय. त्यामुळं कोणीही शिवी दिली तर लगेचच ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना याची माहिती कळेल. इतकंच नाही तर सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे एक पथक गावात फिरणार आहे. या वेळेत शालेय विद्यार्थ्यांकडं सेलफोन आढळल्यास त्यांच्या पालकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येईल. तसंच बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी कोणीही बालकामगार कामाला ठेवू नये आणि ठेवल्यास त्याच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याच बरोबर कोणालाही बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडं आणून देणाऱ्याला एक हजार रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिलीय.
येथील दोन शेतकऱ्यांचा शेतीच्या बांधावरून वाद झाला. तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या. सकाळी सरपंच शरदराव आरगडे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या बांधावर जाऊन त्यांना बांधावर पोल उभे करण्याचं सांगून वाद मिटवला. यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचं प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला. ग्रामपंचायतने त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करून यापुढे शिव्या न देता बांधभाऊ म्हणून गोडीगुलाबीने राहण्यास सांगितलं. दंड भरून यापुढे शिवीगाळ करणार नसल्याचं सांगितलं. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्रामनिधित भरणार असून सदरच्या रकमेतून शिवीगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे म्हणून फ्लेक्स बोर्ड लावणार असल्याचं सांगितलं.