FIPRESCI : नगर : मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोकपरंपरेची ताकद आणि आधुनिक विचारांची प्रभावी सांगड घालणारा ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट (Gondhal Marathi Movie) सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा इतिहास घडवत आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) (FIPRESCI) कडून ‘गोंधळ’ला मिळालेला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार (International award) हा मराठी सिनेसृष्टीसाठी (Marathi Film Industry) अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरत आहे. जागतिक स्तरावरील नामांकित समीक्षकांनी या चित्रपटाची दखल घेणं, ही मराठी कलेच्या ताकदीची ठळक पावती मानली जात आहे.
नक्की वाचा: कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर
पुरस्कार ‘समीक्षकांची सर्वोच्च दाद’
फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म क्रिटिक्स (फिप्रेस्को) ही जगभरातील आघाडीच्या चित्रपट समीक्षकांची स्वतंत्र आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटना आहे. कान्स, व्हेनिस, बर्लिन, टोरांटो यांसारख्या जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सवांमध्ये ही संघटना अधिकृत ज्युरीपासून स्वतंत्रपणे चित्रपटांचे मूल्यमापन करून पुरस्कार प्रदान करते. कलात्मक गुणवत्ता, सांस्कृतिक आशय, सामाजिक आशयघनता, दिग्दर्शनातील धाडस आणि नावीन्यपूर्ण मांडणी यांना प्राधान्य देणारा हा पुरस्कार ‘समीक्षकांची सर्वोच्च दाद’ म्हणून मानला जातो. सध्या या संघटनेचे नेतृत्व इजिप्शियन फिल्म क्रिटिक अहमद शॉकी करत असून, सांस्कृतिकदृष्ट्या खोलवर रुजलेले आणि धाडसी सिनेमॅटिक प्रयोग करणाऱ्या चित्रपटांवर फिप्रेस्को विशेष प्रकाशझोत टाकते. एखाद्या चित्रपटाला मिळणारा हा सन्मान त्याच्या जागतिक प्रवासाला नवी दिशा देणारा ठरतो आणि हा मानाचा पुरस्कार ‘गोंधळ’ या चित्रपटाला मिळाला आहे.

हे देखील वाचा: अजितदादांच्या पक्षातील मंडळी पुढील राजकारण कसं करणार?
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असे दोन पुरस्कार (FIPRESCI)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘गोंधळ’ने याआधीही अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये आपली ठसकेबाज छाप उमटवली आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच २२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६मध्येही या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पिकॉक’ अवॉर्ड मिळवत ‘गोंधळ’ने राष्ट्रीय पातळीवरही मोठी दखल मिळवली. एकाच चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता मराठी चित्रपटसृष्टीसाठी खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरत आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडूनही ‘गोंधळ’ला भरभरून प्रतिसाद मिळाला. नवरा–नवरीच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक ‘गोंधळ’ विधीच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली ही कथा अंधश्रद्धा, कुटुंबातील संघर्ष, बदलते सामाजिक दृष्टिकोन आणि मानवी भावनांचा सूक्ष्म वेध घेते. ध्वनी, प्रकाश आणि दृश्यांची लयबद्ध मांडणी करत लोकपरंपरेला आधुनिक सिनेमॅटिक भाषेत सादर करणं, ही या चित्रपटाची खासियत ठरते.
या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, ‘फिप्रेस्को’ सारख्या जागतिक स्तरावरील समीक्षक संघटनेकडून ‘गोंधळ’ला मिळालेला सन्मान आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या मातीतली कला, श्रद्धा आणि लोकपरंपरा यांचा आवाज आहे. जागतिक पातळीवर मराठी कलेला मिळालेली ही दाद संपूर्ण टीमच्या मेहनतीचा गौरव आहे.”
‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांनी या चित्रपटाला दमदार अभिनयाची ताकद दिली आहे.
प्रेक्षकांची पसंती, समीक्षकांची दाद आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मालिका यामुळे ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट आज जागतिक व्यासपीठावर मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा ठसकेबाज आणि अभिमानास्पद सिनेमा ठरत आहे.



