Fire : संगमनेर : शहरानजीक कासारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लब व रिसॉर्टमध्ये असलेल्या मालपाणी पॅलेस (Malpani Palace) समोरील लॉन्स मध्ये असलेल्या लग्नाच्या डेकोरेशन सेटला अचानक आग (Fire) लागली. ही आग इतकी भयंकर होती की, या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. तब्बल एक तास ही आग सुरू होती. संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मोबाईलवरून संपर्क केला असता, अग्निशमन दल (Fire Brigade) जवळपास पाऊण ते एक तास उशिरा आल्याने आग विझवण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली.
नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड
व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या डेकोरेशनने घेतला पेट
बुधवारी (ता.१९) दुपारी पॅलेसच्या या मैदानावर एका समारंभासाठी स्टेजची तयारी केली जात होती. ही तयारी अंतिम टप्प्यात असतानाच आगीची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. साडेतीन वाजण्याच्या सुमारास रखरखत्या उन्हात व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या डेकोरेशनने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला होता. क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने काही मिनिटातच समारंभासाठी उभे करण्यात आलेले व्यासपीठ जळून खाक झाले.

अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून
अग्निशामकच्या मदतीने विझविली आग (Fire)
घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, उपमुख्य अधिकारी संजय पेखळे, बांधकाम अभियंता प्रशांत जुन्नरे, पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे, कार्यालयीन निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, अमजद पठाण, सतीश बुरुंगुले, प्रवीण ताजणे यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. संगमनेर साखर कारखान्यासह काही अग्निशामकच्या मदतीने लागलेली आग विझविली जात होती.
आग लांबवर पसरल्याने पॅलेसच्या कंपाउंड बाहेर असलेल्या उसाने देखील काही प्रमाणात पेट घेतला होता. आगीसोबतच ऊस वाचविण्याचे काम अग्निशामक दलाला करावे लागले. दरम्यान, या आगीमध्ये एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर एक जण बचावला आहे. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी, मनीष मालपाणी उपस्थित होते. पोलीस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व पुढील कारवाईचे आदेश दिले.