Flag Day : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याने ध्वजदिन (Flag Day) निधीचे विक्रमी संकलन करत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केली आहे. त्यामुळे राजभवन येथे आयोजित सेना दिवस कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यावतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर (निवृत्त) वि.ल. कोरडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नक्की वाचा : ‘ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा’- गोपीचंद पडळकर
जवानांच्या पुनर्वसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधीचे योगदान
भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान देण्याचे अवाहन सालीमठ यांनी गतवर्षी केले होते. त्याला जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
अवश्य वाचा : ‘आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व हरपलं’;विखेंकडून श्रद्धांजली
विविध संस्था व कार्यालयांचा सक्रिय सहभाग (Flag Day)
जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सहकारी संस्था, धार्मीक संस्था, कृषी विद्यापीठ, राज्य परिवहन महामंडळ आणि नागरिकांनी ५ कोटीहून अधिक ध्वजदिन निधी संकलन करण्यात भरीव योगदान दिले. यात शिर्डी साई संस्थान, जिल्हा परिषद, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महानगरपालिका, नगरपालिका आणि पोलीस विभागाने सर्वाधिक योगदान आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याने १ कोटी ८४ लाख ९८ हजार रुपयांचे उद्दिष्ट असतांना ५ कोटी ८ लाख ६८ हजार ३०८ रुपये एवढा अर्थात २७५ टक्के निधी संकलित केला. लातूर ४२ लाख २२ हजार रुपये उद्दिष्ट असतांना ९७ लाख रुपये, नागपूर १ कोटी ९१ लाख ९८ हजार रुपये उद्दिष्ट असतांना ३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपये, अमरावती १ कोटी १० लाख उद्दिष्ट असतांना १ कोटी ३८ लाख ८० हजार रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्याने १ कोटी ६० लाख ७९ हजार रुपये उद्दिष्ट असतांना २ कोटी रुपये एवढा निधी संकलित केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली.