Flood : पाथर्डी: तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे (Cloudburst) अनेक गावांत पुरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा कठीण प्रसंगी सुवर्णयुग तरुण मंडळ आणि जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे (Mohata Devi) यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
अवश्य वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता
जेवणाचे तयार डबे पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविले
सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने सोमवारी सकाळपासूनच समाजसेवेचा उपक्रम सुरू करण्यात आला. जेवणाचे डबे तयार करून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ते पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात आले. या जेवणात पाच पुरी, बटाटा भाजी, शेंगदाणा चटणी, बिस्किट पुडा व पाण्याची बाटली यांचा समावेश होता. या अन्नदान उपक्रमातून तिसगाव, करंजी व जवखेडे खालसा येथील सुमारे ३०० हून अधिक नागरिकांना दिलासा मिळाला. मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी कोणतीही परवा न करता एकत्रितपणे श्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला.
नक्की वाचा: महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर मुदतीत ४० हरकती दाखल
देवस्थान कडून अन्न, पाणी व आवश्यक वस्तूंचे वाटप (Flood)
दरम्यान, जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे यांनीसुद्धा पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला. स्थानिक नागरिकांसाठी अन्न, पाणी व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करून संकट काळात दिलासा दिला. स्वतः देवस्थानचे कर्मचारी पूर परिस्थितीमध्ये उभा राहून लोकांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. पूरस्थितीत दोन्ही संस्थांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी नागरिकांसाठी मोठा आधार ठरली आहे. सुवर्णयुग तरुण मंडळ हे विविध समाजकार्यातून नेहमी प्रशासनाच्या मदतीला धावून येते. समाजाचे ऋण फेडण्याची परंपरा त्यांनी कायम राखली असून, या कठीण प्रसंगातही त्यांनी समाजातील बांधवांना मदतीचा हात देत मानवीयतेचे दर्शन घडवले आहे. या अन्नदान उपक्रमाबद्दल प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार उद्धव नाईक यांनी सुवर्णयुग तरुण मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत मंडळाचे विशेष आभार मानले आहेत.