Football : नगर : जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमुळे (State Level Football Tournament) या खेळातील कौशल्ये व गुणवत्तेच्या खेळाडूंमध्ये देवाण-घेवाण होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले. तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (Subroto Cup) स्पर्धेतून जागतिक स्तरावरील ऑलिंपिक स्पर्धेसाठी फुटबॉलपटू घडावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, जिल्हा फुटबॉल संघटना, शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पहिल्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अवश्य वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य नोएल पारगे, रजिस्ट्रार हेमलता भिंगारदिवे, सचिव प्रदीप जाधव, खलील सय्यद, सोवियो वेगास, ऑलिंपिक संघटनेचे शैलेश गवळी, धीरज मिश्रा, फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनक फर्नांडिस आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले,
शालेय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवले, तर त्यांच्या गळ्यात निश्चितच अनेक सुवर्णपदके चमकतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, (Football)
सुब्रतो मुखर्जी राज्यस्तर फुटबॉल कप ही राज्यातील महत्त्वपूर्ण फुटबॉल स्पर्धा आहे. राज्यभरातून आलेल्या आठ विभागातील विजेत्या खेळाडूंमधून उत्कृष्ट फुटबॉल खेळाचे प्रदर्शन पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या बँडच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी १५ वर्ष व १७ वर्षे वयोगटातील मुलांचे महाराष्ट्रातील आठ विभागातील २५६ खेळाडू, ३२ संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक आणि २५ पंच सहभागी झाले.सर्व विभागांच्या खेळाडूंच्या एकजुटीतून पाहुण्यांच्या शुभहस्ते स्पर्धेची क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले, “फुटबॉल हा जागतिक खेळ असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नवीन खेळाडूंची पिढी या खेळाकडे आकर्षित होत आहे. विविध जिल्ह्यातून गुणवत्तेने पुढे आलेले खेळाडू निश्चितच देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत,” असे प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले, स्वागत क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी तर क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे, रमेश जगताप, तसेच फुटबॉल संघटनेचे पंच अभिषेक सोनवणे, संकेत बनसोडे, मनीष राठोड, सुमित राठोड, व्हिक्टर जोसेफ, जोनाथन जोसेफ, सचिन पाथरे, अभय साळवे, जेवियर स्वामी, राजेश अँथनी आदींनी परिश्रम घेतले.