नगर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (Jimmy Carter) यांचे काल (ता.२९) निधन (Death) झाले. वयाच्या १०० व्या वर्षी जॉर्जियातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष (President of Unites States) होते.कार्टर काही काळापासून मेलेनोमा आजाराने त्रस्त होते. हा एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे. तो त्यांच्या यकृत आणि मेंदूमध्ये पसरला होता.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात होतं.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री
जिमी कार्टर स्वतंत्र भारतात येणारे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (Jimmy Carter)
जिमी कार्टर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२४ रोजी सामान्य कुटुंबात झाला. ते १९७७ ते १९८१ दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आर.फोर्ड यांचा पराभव करत ते १९७७ साली राष्ट्राध्यक्ष बनले. २००२ मध्ये त्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं होतं. विशेष बाब म्हणजे जिमी कार्टर यांचे भारताशी खास ऋणानुबंध होते. स्वतंत्र भारतात येणारे ते अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. आजही त्यांच्या भारत भेटीच्या आठवणी सांगितल्या जातात. त्यांच्याच नावावर हरियाणातील एका गावाचं नाव कार्टरपुरी असं ठेवण्यात आलं होतं.
जिमी कार्टर यांची कारकीर्द (Jimmy Carter)

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जिमी कार्टर यांनी १९६० मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि १९७१ मध्ये ते प्रथमच त्यांच्या राज्याचे राज्यपाल झाले. सहा वर्षांनंतर जिमी कार्टर यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांचा पराभव केला आणि ते अध्यक्ष झाले. कार्टर यांच्या कार्यकाळात त्यांना अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. यामध्ये शीतयुद्धातील तणाव, तेलाच्या अस्थिर किंमती आणि वांशिक समानता आणि स्त्रियांच्या हक्कांबाबत अनेक अमेरिकन राज्यांमधील हालचालींचा समावेश होता. १९७८ मधील कॅम्प डेव्हिड करार, इजिप्शियन राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांच्यातील ऐतिहासिक शांतता करार ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती. या कराराने मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित केली आणि कार्टर यांना शांतता समर्थक नेते म्हणून प्रस्थापित केले.
अवश्य वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय
जिमी कार्टर यांच्या निधनावर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जिमी कार्टर यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून अमिट वारसा सोडला आहे. अमेरिका एका नाजूक काळातून जात असताना जिमी अध्यक्ष होते. या काळात, त्यांनी अनेक आव्हानांना तोंड दिले आणि सर्व अमेरिकन लोकांचे जीवन सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मी त्यांच्या विचारांशी आणि राजकीय दृष्टिकोनाशी असहमत असलो तरी, मला हे देखील जाणवले की ते आपल्या देशावर आणि त्याच्या आदर्शांवर मनापासून प्रेम करतात. यामुळे मला त्यांच्याबद्दल आदर आहे.