Fraud : नगर : आपण मंत्र्याचे भाचे आहोत, तुम्हाला थेट मंत्रालयातून (Ministry) कामे मंजूर करून देतो, असे आमिष दाखवत एकाने नगरमधील अनेक शासकीय ठेकेदारांकडून लाखो रुपये घेत त्यांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन ठेकेदारांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. या दोघांची ९ लाख ४० हजारांची फसवणूक झाली आहे. याबाबत सचिन गोरख रासकर (वय २८, रा. हंगा, ता. पारनेर) यांनी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!
हायमास्ट विद्युत दिव्यांचे काम मिळवून देण्याचे आश्वासन
फिर्यादी हे शासकीय विद्युत व स्थापत्य ठेकेदार आहेत. त्यांच्यासमवेत गणेश महादेव काळे (रा. एकनाथनगर, केडगाव) हे ही शासकीय ठेकेदार असून त्यांच्या ओळखीचे आहेत. मे २०२४ मध्ये फिर्यादी हे मुंबईत मंत्रालयात गेले असताना त्यांची असिफ अत्तार खान (रा. कोंढवा, पुणे) या व्यक्तीशी भेट झाली. त्याने आपण अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे भाचे आहोत, असे सांगत त्यांच्यासोबतचे फोटो दाखविले. त्यानंतर तुम्हाला अल्पसंख्यांक विभागातील हायमास्ट विद्युत दिव्यांचे काम मिळवून देतो. मी अनेक ठेकेदारांना कामे मिळवून दिली आहे. तेव्हा फिर्यादी यांनीही त्याला आम्हाला कामे मिळवून द्या असे सांगितले. त्याने त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया
९ लाखांची फसवणूक (Fraud)
फिर्यादी यांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी असिफ खान याने तुमच्यासोबत इतर ठेकेदारांना गोळा करून सर्वांना एकाच वेळी कामे मंजूर करून देतो, असे सांगितल्यावर फिर्यादीने त्यांच्या ओळखीचे गणेश काळे यांना याबाबत सांगितले. जुलै २०२४ मध्ये असिफ खान याने फिर्यादी यांना फोन करून कामांसाठी ९ लाख रुपये लागतील, ते फोन पे वर पाठवा, असे सांगितले. मात्र, फिर्यादी यांनी फोन पे वर एवढे पैसे जात नाहीत, असे सांगितल्यावर असिफ खान याने मी उद्या नगरला येत आहे. पैसे तयार ठेवा, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी गणेश काळे यांच्या मार्केट यार्ड येथील ऑफिसमध्ये काळे यांनी फिर्यादी समक्ष असिफ खान यास ८ लाख रुपये दिले. तसेच ऑनलाईन दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी कामासाठी अनेकदा असिफ खान याच्याशी संपर्क साधला मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांचा तथाकथित भाचा असिफ खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.