Fraud : नगर : भारतात अनेक विदेशी पर्यटक (Foreign Tourists) फिरण्यासाठी येत असतात. हे पर्यटक स्थानिक बाजार व मार्केटमधून त्यांना आवडलेल्या वस्तू खरेदी करत असतात. यामधून आपल्या देशाच्या रोजगार वाढीसाठी चालना मिळत असते. परंतु परदेशी पाहुण्यांची भारतात फसवणूक (Fraud) होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. विदेशी पर्यटकांच्या अज्ञानाचा किंवा ते परत येणार नाहीत या गोष्टीचा फायदा घेऊन त्याची फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार जयपूरच्या जोहरी बाजारातून समोर आला आहे. अमेरिकेतील (America) चेरीश यांना ३०० रुपयांचे दागिने तब्बल ६ कोटींना विकले आहेत. याप्रकरणी दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नक्की वाचा : ही भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल
दागिना बनावट असल्याचं सिद्ध (Fraud)
अमेरिकेत राहणाऱ्या चेरीश ही पर्यटनासाठी आली असताना जयपूरच्या जोहरी बाजारातून दागिने खरेदी केले होते. या दागिन्यांची किंमत ६ कोटी रुपये सांगण्यात आली. चेरीश यांनी हा दागिना विकत घेतला आणि अमेरिकेतील एका प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवला. परंतु, या प्रदर्शनात हा दागिना बनावट असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे चेरिशला ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागला.
अवश्य वाचा : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार
दुकान मालकाने तिच्याचविरोधात दाखल केला खोटा गुन्हा (Fraud)
सहा कोटींचा हा व्यवहार असल्याने अमेरिकेहून चेरीश पुन्हा भारतात परतली आणि तिने जिथून दागिना विकत घेतला होता त्या दुकानात गेली. परंतु, महिलेच्या तक्रारीकडे दुकानदारांनी दुर्लक्ष केलं. या दुकानाचे मालक राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी यांनी दागिना बनावट असल्याचा दावा फेटाळून लावला. त्यामुळे संतापलेल्या चेरीशने मानक चौक पोलीस ठाण्यात दुकानमालकाविरोधात तक्रार दाखल केली. परंतु, दुकान मालकाने तिच्याचविरोधात खोटा गुन्हा दाखल केला.
या संपूर्ण प्रकरात चेरीश ही ६ कोटी परत कसे मिळवायचे या विवंचनेत होती. त्यामुळे तिने तत्काळ अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधला. अमेरिकेच्या दुतावासांनी थेट जयपूर पोलिसांकडे याबाबत विचारणा केल्यावर याप्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला. त्यामुळे हे दागिने खरोखर बनावट असल्याचं आढळून आलं. दरम्यान, दुकानाचे मालक राजेंद्र सोनी आणि त्यांचा मुलगा गौरव सोनी सध्या फरार आहे. तर दागिन्यांसाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या नंद किशोरला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पकडण्यासाठी जयपूर पोलिसांचं विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.
जयपूर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात दुकानमालकांनी नुकतीच तीन कोटी रुपयांची अपार्टमेंट खरेदी केल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपींनी ३०० रुपये किमतीचे सोन्याचे पॉलिश असलेले दागिने परदेशी महिलेला ६ कोटी रुपयांना विकले आणि तिला सत्यतेचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर येत आहे. बनावट प्रमाणपत्र जारी करणाऱ्या नंद किशोरला अटक करण्यात आली असून, फरार पिता-पुत्राचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.