Fraud : नगर : अहिल्यानगर येथील फळ व्यापाऱ्याने हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधून मागावलेल्या ८ ट्रक सफरचंदापैकी २ ट्रक सफरचंदाची परस्पर विल्हेवाट लावून व्यापाऱ्याची १९ लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्याकडे काम करणारा कामगार, ट्रक चालक, मालक अशा ५ जणांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती
८ ट्रक सफरचंद मागवले होते
याबाबत संतोष प्रभू ढवळे (वय ४६, रा. माळीवाडा, अ.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा फळांचा ठोक व्यापार असून त्यांचे शेंडी (ता. अहिल्यानगर) येथे गोडावून आहे. ते नेहमी हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीकडून सफरचंद मागवतात. त्यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये हिमाचल प्रदेश येथून ८ ट्रक सफरचंद मागवले होते. त्यासाठी त्यांच्या कडे काम करणारा मोईन शेख मुन्शी बागवान (रा. बुलढाणा) याला हिमाचल प्रदेश येथे पाठविले होते.
अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार
संगनमत करून सफरचंदाची परस्पर विक्री (Fraud)
२८ ऑगस्ट रोजी या सफरचंदाचा व्यवहार पूर्ण होवून ८ ट्रक कंपनीतून अहिल्यानगरकडे येण्यास निघाले. त्यातील ६ ट्रक निर्धारित वेळेत नगरमध्ये फिर्यादी ढवळे यांच्या गोडावूनला पोहचले, मात्र २ ट्रक तसेच त्यांचा कामगार मोईन शेख हा नगरमध्ये आला नाही. मोईन शेख याने त्याचा भाऊ मोहसीन शेख मुन्सी बागवान (रा. बुलढाणा), ट्रक मालक व चालक सत्यनारायण पांडे (रा. भोपाळ, मध्यप्रदेश), शफी बागवान (रा. बुलढाणा), देवेंद्र पंडित (रा. किसनगढ, राजस्थान) यांच्याशी संगनमत करून एका ट्रक मधील सफरचंदाच्या ५०५ फुल पेट्या व ७२ हाफ पेट्या, तर दुसऱ्या ट्रक मधील ७०३ फुल पेट्या अशा एकूण १८ लाख ९९ हजार ९३२ रुपये किंमतीचे सफरचंद यांची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



