Fraud : नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या (Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Maryadit) योजनेतच बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट शाळा सोडल्याचा दाखला, बोगस कर्ज मंजुरी पत्र आणि खोटे बँक स्टेटमेंट सादर करून दोघांनी सुमारे सहा लाख ७४ हजार ७०० रूपयांची रक्कम लाटली आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
संशयित आरोपींची नावे
गौरव शंकर मंचरे (रा. साकुरी, ता. राहाता) आणि राहुल बाळासाहेब चोळके (रा. साकुरी, ता. राहाता), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत महामंडळाचे जिल्हा समन्वयक शिवतेज सुरेश नळे (वय २५, रा. साकुरी) यांनी फिर्याद दिली आहे. मराठा समाजातील तरूणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत आहे.
अवश्य वाचा : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शासनाकडून व्याज परताव्याच्या रकमा लाटल्या (FraudFraud)
‘महास्वयम्’ या पोर्टलव्दारे मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय कर्जावर व्याज परतावा दिला जातो. यासाठी अर्जदाराला आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला यासह कर्ज मंजुरी पत्र, रि-पेमेंट शेड्युल, लोन अकाउंट स्टेटमेंट, अशी कागदपत्रे अपलोड करावी लागतात. मात्र, संशयित आरोपी गौरव मंचरे आणि राहुल चोळके यांनी संगनमत करून सर्व कागदपत्रे बनावट तयार केली. त्यांनी खोटे कर्ज मंजुरी पत्र, खोटे रि-पेमेंट शेड्युल आणि बोगस बँक स्टेटमेंट पोर्टलवर अपलोड करून शासनाकडून वेळोवेळी व्याज परताव्याच्या रकमा लाटल्या आणि शासनाची फसवणूक केली. सुमारे सहा लाख ७४ हजार ७०० रूपयांची रक्कम लाटल्याचे फिर्यादीत म्हटले.



