Fraud : नगर : केंद्र शासनाकडून (Central Government) आश्रमशाळेसाठी मिळालेल्या तब्बल २ कोटी ४८ लाख रूपयांच्या अनुदानात अपहार (Fraud) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान, भिंगार, अहिल्यानगर) या संस्थेत हा अपहार झाला असून यासंदर्भात संस्थेच्या अध्यक्षासह सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) मंगळवारी (ता. १८) फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक
यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल
समाजकल्याण कार्यालयातील सहायक लेखाधिकारी संदीप हरीभाऊ देठे (वय ४६) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संस्थेचा अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे, सचिव अनिल तुळशीदास शिंदे, विश्वस्त संजय बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, विश्वस्त राजू बन्सी साळवे आणि रेखा संजय साळवे (सर्व रा. भिंगार, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार
शासनाचा निधी वैयक्तिक खात्यावर परस्पर वळविला (Fraud)
भिंगार येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेने २०१५ ते २०२० या कालावधीत केंद्र शासनाकडून केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेसाठी अनुदान मिळवले होते. शासनाने संस्थेच्या खात्यावर २ कोटी ४८ लाख २१ हजार ४२४ रूपये जमा केले. नियमानुसार हा निधी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि शाळेच्या भौतिक सुविधांवर खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून हा निधी शाळेसाठी न वापरता, तो श्रध्दा एंटरप्रायजेस, सुभाष साळवे, क्षितिज शर्मा व इतर नातेवाईकांच्या वैयक्तिक खात्यावर सुमारे २ कोटी २४ लाख रूपये परस्पर वळविले. धक्कादायक बाब म्हणजे, कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला असतानाही, त्यांच्या नावे वेतन काढून शासनाची फसवणूक करण्यात आली. तसेच एकाच कर्मचाऱ्याला शाळा आणि वसतिगृह अशा दोन्ही ठिकाणी कामावर दाखवून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे चौकशीत समोर आले आहे.



