Fraud | शेअर मार्केटच्या नावाने लाखोंची फसवणूक; सरपंचासह नऊ जणांना गंडा

सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन

0


Fraud: पाथर्डी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने जास्त व्याज आणि सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका सरपंचासह नऊ जणांची लाखोंची फसवणूक (Fraud) करण्यात आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतर दोन फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. एकूण ९१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवश्य वाचा- पारनेर शहरामध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचा निर्णय

सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन (Fraud)

घटनेची माहिती अशी की, तोंडोळी गावचे सरपंच नंदकिशोर शिवाजी वारंगुळे (वय २७) यांना त्यांचे ओळखीचे अनिल आबासाहेब बंड यांनी कोरडगाव येथे बोलावून त्यांचा भाचा श्रेयस जयराम गरड आणि पुतण्या रोहित दादासाहेब बंड यांची ओळख करून दिली. हे तिघे शेअर मार्केट ट्रेडिंग करत असल्याचे सांगून, त्यांनी बोधेगाव येथे शौर्य ट्रेडर्स आणि कोरडगाव येथे शिवराज ट्रेडर्स नावाचे ऑफिस सुरू केले असल्याचे सांगितले. गुंतवणूकदारांना १७ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त व्याज आणि सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी सरपंच वारंगुळे यांना विश्वासात घेतले. १६ जानेवारी २०२४ रोजी सरपंच वारंगुळे यांनी शौर्य ट्रेडर्समध्ये २४ लाख ५० हजार रुपये गुंतवले.

नक्की वाचा- नेमकं कोणाचा फोन आला? आमदार रोहित पवारांनी वेगळाच संशय व्यक्त केला

सरपंच वारंगुळे यांची पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद (Fraud)

काही दिवसांनंतर पैशाची गरज पडल्याने त्यांनी पैसे मागितले असता, आरोपींनी फक्त ५ लाख रुपये परत केले. उर्वरित १९ लाख ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली आणि आर्थिक अडचणींचे कारण सांगून भुलथापा दिला. अखेर आरोपी गाव सोडून पळून गेले आणि सरपंचांना फसवणुकीची जाणीव झाली. सरपंच वारंगुळे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अनिल आबासाहेब बंड (कोरडगाव) याला अटक केली. रोहित दादासाहेब बंड (कोरडगाव) आणि श्रेयस जयराम गरड (बालमटाकळी) हे दोघे फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.