Fraud : श्रीगोंदा: येरवडा जेलमधील ओळख, स्वस्त सोन्याचे आमिष आणि निर्जनस्थळी रचलेला सापळा… एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असा थरार कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथे घडला आहे. पाव किलो सोन्याच्या मोहापायी चाकणच्या दोन तरुणांना पाच लाख रुपयांचा चुना (Fraud) लागला असून, श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून पाच हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
अवश्य वाचा- कृषी विद्यापीठांची राष्ट्रीय स्तरावर होत असलेली घसरण दुर्दैवी : सत्यजित तांबे
येरवडा जेलमध्ये असताना ओळख (Fraud)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील कडाचीवाडी भागातील फिर्यादीचा मित्र एका गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये असताना त्यांची ओळख कोळगावमधील एका व्यक्तीशी झाली. या इसमाने तरुणाला स्वस्त दरात सोने मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवले होते. फिर्यादी याचा मित्र जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने फिर्यादीला माहिती देत संबंधित व्यक्तीशी स्वस्तात सोन्यासाठी संपर्क साधला. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला १ ग्रॅम खरे सोने दिले, जे फिर्यादीने सोनाराकडे मोडून खात्री करून घेतली. त्यानंतर पाव किलो सोने ५ लाख रुपयांत देण्याचे फिर्यादी आणि आरोपींमध्ये ठरले. त्यानुसार शनिवारी (ता.२८) दुपारी फिर्यादी तरुण पाच लाख रुपये घेऊन कोळगाव येथील पांढरेवाडी परिसरात आले. आरोपींनी त्यांना मुख्य रस्त्यापासून अर्धा ते पाऊण किलोमीटर आत असलेल्या एका निर्जनस्थळी नेले. तिथे अगोदरच हजर असलेल्या १५ ते २० जणांनी फिर्यादी कडून पैशांची बॅग हिसकावून घेत आरोपींनी तरुणांना धमकावत त्यांना मारहाण सुरू केली. घाबरलेल्या तरुणांनी तेथून पळ काढला आणि थेट पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली.
नक्की वाचा- कर्जतमध्ये बंद पाळत गोदड महाराज मंदिरासमोर धरणे आंदोलन; ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी
घटनास्थळी सापडले आरोपीचे घड्याळ (Fraud)
घटनेचे गांभीर्य ओळखून बेलवंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी नंदकुमार सोनवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी आरोपीचे घड्याळ सापडले. कोळगाव परिसरात माहिती काढत असताना, पोलिसांनी सापळा रचून कोळाई देवी मंदिराच्या परिसरातून दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले त्यांचे कपड्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात फिर्यादी यांनी दिलेल्या रकमेपैकी पाच हजार रुपयांची रक्कम सापडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोळगाव परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. तपासादरम्यान घटनास्थळी आरोपीचे घड्याळ पडले होते, ज्यावरून पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. फिर्यादी कडून लुटलेल्या नोटांवर गुलाबी रंगाचे निशाण होते. पकडलेल्या आरोपींकडे अशाच निशाण असलेल्या नोटा सापडल्याने गुन्ह्याची खात्री पटली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले तीन आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून या घटनेतील मुख्य सूत्रधारांचा पोलीस शोध घेत आहेत.



